*राजापूर डोंगर गावच्या ओवी पवारची नासाच्या अमेरिका दौऱ्यासाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर डोंगर गावच्या ओवी पवारची नासाच्या अमेरिका दौऱ्यासाठी निवड*
*राजापूर डोंगर गावच्या ओवी पवारची नासाच्या अमेरिका दौऱ्यासाठी निवड*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील दुर्गम डोंगर गावातील विद्यार्थिनी ओवी संदीप पवार हिने जिल्हा परिषद रत्नागिरीच्या ‘जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान’ उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या नासा भेट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची प्रत्यक्ष अमेरिका दौऱ्यासाठी निवड झाली असून, तिच्या या यशामुळे डोंगरसह संपूर्ण पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ओवीच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी डोंगर गावचे उद्योजक व साखरकर बेकरीचे मालक सिराज साखरकर, विलयेचे उपसरपंच अजय तावडे, कणेरीचे माजी सरपंच महेश कण्हेरे, माजी केंद्रप्रमुख विनायक खानविलकर यांनी तिची भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी ओवीचे वडील संदीप पवार (शिक्षक), आई भक्ती पवार (ग्रामपंचायत अधिकारी), आजी ऊर्मिला पवार (माजी सरपंच) तसेच कुटुंबीय उपस्थित होते.
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि अंतराळ संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी इस्रो व नासा भेटीचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध स्तरांवरील परीक्षा व निवड प्रक्रियेद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रत्यक्ष संशोधन केंद्रांना भेट देण्याची संधी दिली जाते.ओवीने यापूर्वीही इस्रो भेट परीक्षेत यश मिळविले असून, बंगळुरू आणि गोवा येथील इस्रो केंद्रांना भेट देण्याची संधी तिला मिळाली आहे. आता थेट अमेरिकेतील नासा संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी तिची झालेली निवड ही तिच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. ओवी ही राजापूर येथील विश्वनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. दुर्गम ग्रामीण भागात राहूनही जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर तिने मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. तिच्या या कामगिरीमुळे पवार कुटुंबीय, शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांकडून तिचे विशेष कौतुक होत असून, अमेरिका दौऱ्यासाठी तिला सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.



