*"मूल्यवर्धन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हा समन्वयक दिपाली तंबाखे यांची प्रकाशा कन्या शाळेला सदिच्छा भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"मूल्यवर्धन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हा समन्वयक दिपाली तंबाखे यांची प्रकाशा कन्या शाळेला सदिच्छा भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद*
*"मूल्यवर्धन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हा समन्वयक दिपाली तंबाखे यांची प्रकाशा कन्या शाळेला सदिच्छा भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी केवळ पाठ्यपुस्तकीय ज्ञान पुरेसे नसून त्यांच्यामध्ये नैतिक, सामाजिक, भावनिक व संवैधानिक मूल्यांची रुजवणूक होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव, स्व- जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन, सहकार्याची भावना आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा, प्रकाशा येथे नंदुरबार जिल्हा मूल्यवर्धन समन्वयक दिपाली तंबाखे मॅडम तसेच शहादा तालुका मूल्यवर्धन समन्वयक अंबालाल भिलावे यांनी भेट देऊन शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
शाळेत आगमन झाल्यानंतर त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, शिक्षिका नूतन पाटील, प्रियंका पाटील आणि शिक्षक गोपाल गावित उपस्थित होते. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसमोर मूल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना, त्याचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील उपयोग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सकारात्मक विचार, सामाजिक जाणीव आणि जबाबदार नागरिकत्व विकसित करण्यासाठी मूल्यशिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले.
इयत्ता दुसरीच्या वर्गात कृतीतून अध्ययन-अध्यापन
या प्रसंगी शिक्षक गोपाल गावित यांनी इयत्ता दुसरीच्या वर्गात 'माझा आवडता छंद' हा पाठ प्रभावीपणे शिकविला. विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार व्यक्त करण्याची संधी देत संवादात्मक पद्धतीने अध्यापन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सहभाग, अभिव्यक्ती कौशल्य, आत्मविश्वास आणि अध्ययनातील उत्सुकता यांचे निरीक्षण करण्यात आले.
दिपाली तंबाखे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच शिक्षकांनाही मूल्यवर्धन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि कृती आधारित अध्ययन -अध्यापन याबाबत मार्गदर्शन केले.बीमूल्य वर्धनातून व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया
मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, जबाबदारी, वैज्ञानिक दृष्टिकोन, करुणा, सेवाभाव, राष्ट्रभक्ती आणि श्रमप्रतिष्ठा यांसारख्या मानवी व संवैधानिक मूल्यांची रुजवणूक करण्यावर भर देण्यात येत आहे.
यासोबतच स्व -जाणीव व स्व -व्यवस्थापन, जबाबदारीने निर्णय घेणे, सुसंवादी नातेसंबंध निर्माण करणे, पर्यावरणाची काळजी घेणे आणि इतरांच्या कल्याणासाठी योगदान देणे या जीवनोपयोगी मूल्यांचाही विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणारी अध्ययन निष्पत्ती
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता ओळखता येणे, भावना आणि वर्तन यांच्यातील संबंध समजून घेणे, आरोग्य व स्वच्छतेच्या मूलभूत सवयी अंगीकारणे, वर्गनियम व त्यांचे परिणाम समजून घेणे, इतरांचा आदर करणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणे या अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यावर विशेष भर दिला जात आहे. निरोगी व सुरक्षित जीवनशैली विकसित करणे, स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन करणे, सामाजिक नियमांना सकारात्मक प्रतिसाद देणे, नैसर्गिक वातावरणाबद्दल कृतज्ञताभाव निर्माण करणे, निरीक्षण व तार्किक विचार विकसित करणे, प्रभावी संवाद कौशल्ये आणि अध्ययनाच्या चांगल्या सवयी जोपासणे ही या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. वर्गनियमन, स्व -जाणीव, व्यक्तिगत जबाबदाऱ्या, नातेसंबंध, सामाजिक जबाबदाऱ्या या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक, जोडीने, सामूहिक तसेच गटांमध्ये विविध कृती करण्याची संधी दिली जाते. कृती पूर्ण झाल्यानंतर शिक्षक प्रश्नोत्तर, चर्चा व अनुभव कथनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करतात. काही उपक्रम घरच्या घरी करण्यासाठी दिले जातात. त्यामुळे शाळा आणि घर यांच्यातील शैक्षणिक नाते अधिक दृढ होण्यास मदत होते. उपक्रमांचे नियोजन करताना शिक्षकांनी पुस्तिकेतील मार्गदर्शक सूचनांचे वाचन करून योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी, असेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. मूल्यशिक्षण
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये विद्यार्थ्यांमध्ये विवेकी आचरण, समानुभूती, धैर्य, परिस्थितीनुसार स्वतःला सावरण्याची क्षमता, वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता, सर्जनशीलता आणि मूल्यांशी घट्ट नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व विकसित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
मानवी व संवैधानिक मूल्यांची रुजवणूक, संवाद, सहकार्य, सांघिक कार्य, सामाजिक -नैतिक व भावनिक कौशल्यांचा विकास या बाबींना शिक्षण प्रक्रियेत महत्त्व देण्यात आले आहे. या अनुषंगाने मूल्यवर्धनाचे उपक्रम नियमित 35 ते 45 मिनिटांच्या तासिकांमध्ये राबविता येतात. काही उपक्रमांसाठी एकापेक्षा अधिक तासिकांची आवश्यकता भासू शकते. परिपाठ व वर्ग अध्यापनाचे निरीक्षण भेटीदरम्यान दिपाली तंबाखे यांनी शाळेतील परिपाठाचे निरीक्षण केले. विद्यार्थ्यांचा सहभाग, शिस्त, सादरीकरण आणि परिपाठाची गुणवत्ता यांचा आढावा घेतला. त्याचबरोबर वर्ग अध्यापनाचे निरीक्षण करून अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षक -विद्यार्थी संवाद आणि अध्ययन निष्पत्ती याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक ही केवळ एका तासिकेपुरती मर्यादित न राहता शाळेतील प्रत्येक कृतीतून आणि दैनंदिन वर्तनातून प्रतिबिंबित व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. नाविन्यपूर्ण उपक्रमाचे शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध आनंददायी कृती, खेळ यांचेही कौतुक केले.
विद्यार्थिनींच्या कलाकृतींची विशेष भेट या भेटीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पकतेतून व मेहनतीतून तयार केलेले दिवाळी सणानिमित्ताचे आकर्षक आकाशकंदील व पणत्या मान्यवरांना भेट देण्यात आल्या. विद्यार्थिनींच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम त्यांच्या सर्जनशीलतेचे, श्रमप्रतिष्ठेचे आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण ठरला. एकंदरीत, जिल्हा परिषद कन्या शाळा, प्रकाशा येथे झालेली ही भेट मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी प्रेरणादायी ठरली. शिक्षणातून केवळ ज्ञानप्राप्ती न होता विद्यार्थ्यांमध्ये चांगला माणूस, संवेदनशील नागरिक आणि जबाबदार व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या दिशेने शाळेने सुरू ठेवलेल्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले.
या भेटीमुळे शाळेतील शिक्षकांना मूल्यवर्धन उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली.



