*प्रधानमंत्री पीक विमा योजना, केळी फळपिकासाठी विमा अर्जसादर करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रधानमंत्री पीक विमा योजना, केळी फळपिकासाठी विमा अर्जसादर करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ*
*प्रधानमंत्री पीक विमा योजना,केळी फळपिकासाठी विमा अर्जसादर करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2026 -27 च्या आंबिया बहार हंगामासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील केळी या अधिसूचित फळपिकासाठी विमा अर्ज सादर करण्याची मुदत 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. बदलत्या हवामानामुळे कमी पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी, जास्त तापमान व आर्द्रता यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि उत्पादनातील जोखीम कमी व्हावी, यासाठी ही योजना उपयुक्त आहे. योजने अंतर्गत निर्धारित हवामान निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. योजनेत सहभागी होण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) मध्ये पिकाची नोंद, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार संलग्न बँक खाते, उत्पादनक्षम फळबाग असणे आणि फळबागेचे जिओ टॅगिंग (Geo Tagging) करणे आवश्यक आहे.
नंदुरबार जिल्ह्यात ही योजना इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. केळी पिकासाठी प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार रुपये असून एकूण विमा हप्ता 30 हजार 600 रुपये आहे. त्यापैकी शेतकरी हिस्सा 8 हजार 500 रुपये आहे. आंबा पिकासाठीही प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम 1 लाख 70 हजार रुपये असून एकूण विमा हप्ता 8 हजार 500 रुपये आणि शेतकरी हिस्सा 8 हजार 500 रुपये आहे. आंबा पिकासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2026 आहे. आंबा पीक, अक्राणी तालुक्यात रोषमाळ, चुलवड, खुंटामोडी व तोरणमाळ, तळोदा तालुक्यात प्रतापपूर. केळी पीक,अक्कलकुवा तालुक्यात अक्कलकुवा, तळोदा तालुक्यात तळोदा, बोरद, प्रतापपूर व सोमावल, नंदुरबार तालुक्यात नंदुरबार, धानोरा, खोंडामळी, आष्टे, कोरीट, मांडळ व रनाळे, शहादा तालुक्यात शहादा, प्रकाशा, कलसाडी, म्हसावद, ब्राम्हणपुरी, वडाळी, असलोद, सारंगखेडा, मोहिदा त.श. व मंदाणा या महसूल मंडळांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी आपले विमा प्रस्ताव बँक, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे निर्धारित मुदतीपूर्वी सादर करावेत. संबंधित फळपिकानुसार जोखीमस्तर वेगवेगळे असल्याने अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीपासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येक पात्र फळबागधारकाने आंबिया बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित विमा अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.



