*संशोधनाला चालना देत आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा भर,द इंटरनॅशनल क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी नेटवर्क संस्थेच्या सहकार्याने संशोधन,प्रशिक्षण आणि नवोपक्रमांना मिळण
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संशोधनाला चालना देत आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा भर,द इंटरनॅशनल क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी नेटवर्क संस्थेच्या सहकार्याने संशोधन,प्रशिक्षण आणि नवोपक्रमांना मिळण
*संशोधनाला चालना देत आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा भर,द इंटरनॅशनल क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी नेटवर्क संस्थेच्या सहकार्याने संशोधन,प्रशिक्षण आणि नवोपक्रमांना मिळणार बळ*
मुंबई(प्रतिनिधी):-राज्यातील आरोग्यसेवा अधिक गुणवत्तापूर्ण, परिणामकारक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या गरजांशी सुसंगत करण्यासाठी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय शिक्षण यांची सांगड घालण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे सर्वसामान्यांना अधिक सक्षम आरोग्य सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून वैद्यकीय शिक्षण विभागाने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत द इंटरनॅशनल क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी नेटवर्क या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेच्या सहकार्याने आरोग्यविषयक संशोधन, संशोधकांचे प्रशिक्षण, वैद्यकीय महाविद्यालयांची संशोधन क्षमता आणि धोरणनिर्मिती अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहेत. आरोग्य क्षेत्रातील निर्णय केवळ उपलब्ध माहितीवर नव्हे, तर शास्त्रीय संशोधनातून प्राप्त झालेल्या पुराव्यांवर आधारित असावेत, हा या सहकार्याचा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील आरोग्यविषयक प्राधान्यक्रम निश्चित करणे, विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करणे, आरोग्यसेवेतील त्रुटी ओळखणे आणि त्यावर परिणामकारक उपाययोजना विकसित करणे यासाठी या सहकार्याचा उपयोग होऊ शकणार आहे. यामुळे शासकीय आरोग्य योजनांची परिणामकारकता वाढविण्यासह नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास मदत होईल. द इंटरनॅशनल क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी नेटवर्क ही भारतात नोंदणीकृत ना-नफा तत्वावर कार्य करणारी संस्था असून, तिची स्थापना 1980 मध्ये रॉकफेलर फाउंडेशनच्या अर्थसहाय्याने करण्यात आली. क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय संशोधन आणि संशोधन क्षमतावृद्धी या क्षेत्रांत संस्थेने व्यापक कार्य केले आहे. संस्थेचे जागतिक मुख्यालय 2005 मध्ये भारतात स्थलांतरित झाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्था म्हणून मान्यता मिळालेल्या या संस्थेला 2023 पासून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे सहयोगी उत्कृष्टता केंद्र म्हणूनही मान्यता मिळाली आहे.
देशभरातील 256 हून अधिक संस्थांचे नेटवर्क असलेल्या द इंटरनॅशनल क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी नेटवर्कने आतापर्यंत भारतात 70 हून अधिक मोठ्या बहुकेंद्रीय संशोधन अभ्यासांचे समन्वयन केले आहे.महाराष्ट्रातील 15 हून अधिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसोबत संस्थेने विविध संशोधन उपक्रमांतर्गत काम केले असून, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसोबतही सहकार्याचे संबंध आहेत.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे मूल्यमापन, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, इंजेक्शन सुरक्षितता, बालकांचे पोषण, माता व नवजात बालकांचे आरोग्य, रक्तक्षय निर्मूलन आणि कोविड-19 महामारीतील प्रतिसाद अशा विविध विषयांवर द इंटरनॅशनल क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी नेटवर्कने संशोधन केले आहे. संस्थेच्या इंजेक्शन सुरक्षिततेविषयक देशव्यापी अभ्यासातून असुरक्षित इंजेक्शन पद्धतींचे प्रमाण समोर आले. या संशोधनाच्या निष्कर्षांमुळे लसीकरण सेवांमध्ये सुरक्षित इंजेक्शन पद्धतींचा अवलंब करण्यास आणि काचांच्या सिरिंजऐवजी ऑटो-डिसेबल सिरिंजचा वापर सुरू करण्यास मदत झाली. तसेच, विविध आरोग्य कार्यक्रमांच्या मूल्यमापनातून कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी महत्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पीएटीएच संस्थेसोबत भागीदारी करून 2023-24 या कालावधीत 15 राज्यांमधील 'ॲनिमिया मुक्त भारत’ उपक्रमाचे मूल्यमापनही करण्यात आले आहे. अशा संशोधन अनुभवाचा महाराष्ट्रातील आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी उपयोग होऊ शकणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहकार्याने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, तरुण संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याची संधी आहे. यामध्ये संशोधन पद्धती, जैवसांख्यिकी, अंमलबजावणीविषयक संशोधन, गुणात्मक संशोधन, संशोधन प्रस्ताव तयार करणे, भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित रोगशास्त्रीय अभ्यास आणि डिजिटल माध्यमांतून माहिती संकलन व डेटाबेस व्यवस्थापन यांचा समावेश होऊ शकतो. याशिवाय, वरिष्ठ प्राध्यापकांसाठी संशोधन नेतृत्व व व्यवस्थापन कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रीय संशोधन प्रशिक्षण, संशोधन इंटर्नशिप आणि संयुक्त परिसंवाद व परिषदा आयोजित करण्याचे प्रस्तावित सहकार्याच्या क्षेत्रांत समाविष्ट आहे. पात्र संशोधकांना विद्यापीठात अतिथी किंवा संलग्न प्राध्यापक म्हणून संधी देण्याचाही विचार विद्यापीठाच्या लागू नियमांनुसार करता येऊ शकतो.
द इंटरनॅशनल क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी नेटवर्कने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मेघालय या राज्यांत लोकसंख्या, विकास आणि पर्यावरणविषयक माहिती संकलित करण्यासाठी संशोधन निरीक्षण केंद्रे विकसित केली आहेत. या केंद्रांमध्ये आरोग्यविषयक माहितीसोबतच पर्यावरण, भौगोलिक परिस्थिती आणि मानवनिर्मित परिसराशी संबंधित माहितीचाही अभ्यास केला जातो. अशा बहुआयामी संशोधन पद्धतीचा उपयोग महाराष्ट्रातील स्थानिक आरोग्यविषयक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी होऊ शकणार आहे. राज्याच्या आरोग्यविषयक प्राधान्यक्रमांनुसार संशोधन प्रकल्प विकसित करणे, राष्ट्रीय स्तरावरील संशोधन निधीसाठी प्रस्ताव तयार करणे आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहभागातून संयुक्त संशोधन कार्यक्रम राबविणे यामुळे राज्यातील आरोग्य संशोधनाला नवी दिशा मिळू शकते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजननुसार राज्यातील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण, वैज्ञानिक संशोधन, तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष आरोग्यसेवा यांच्यात समन्वय वाढविणे महत्त्वाचे आहे. द इंटरनॅशनल क्लिनिकल एपिडेमिऑलॉजी नेटवर्क सारख्या अनुभवी संस्थेच्या सहकार्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संशोधनाची संस्कृती विकसित करणे, आरोग्यविषयक निर्णयांना शास्त्रीय आधार देणे आणि शासकीय योजनांच्या परिणामकारकतेत सुधारणा करण्याच्या दिशेने प्रयत्न करता येतील. या माध्यमातून संशोधनाचा लाभ अंतिमतः रुग्णसेवा आणि सार्वजनिक आरोग्याच्या प्रत्यक्ष सुधारणांपर्यंत पोहोचविण्याची संधी निर्माण होईल.



