*ससाळे-रेल्वेस्टेशन-केळवली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य,रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ससाळे-रेल्वेस्टेशन-केळवली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य,रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी*
*ससाळे-रेल्वेस्टेशन-केळवली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य,रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील ससाळे - रेल्वेस्टेशन - केळवली या मार्गाची दुरवस्था झाली असून, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे प्रवास करणे जिकिरीचे बनले असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते हे महत्त्वाचे माध्यम आहे. मात्र, ससाळे –रेल्वेस्टेशन–केळवली मार्गाची दुरवस्था पाहता या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने सावधपणे चालवावी लागत असून, प्रवासाचा वेळही वाढत आहे. दुचाकीस्वारांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांचे अक्षरशः कंबरडे मोडल्याची भावना व्यक्त होत आहे. राजापूर तालुक्यात शिवसेना–भाजप महायुतीची सत्ता असताना ससाळे–रेल्वेस्टेशन–केळवली रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न अद्याप मार्गी का लागत नाही, असा सवाल केळवली परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. रस्त्याच्या प्रश्नाकडे संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
निवडणुकीच्या काळात विकासाची आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचे प्रश्न सुटणार कधी, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. नागरिकांना चांगला रस्ता मिळणे ही केवळ सोयीची बाब नसून, सुरक्षित आणि सुलभ प्रवासासाठीची मूलभूत गरज आहे. संबंधित विभागाकडून रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजविणे आणि आवश्यक ती कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का ससाळे - रेल्वेस्टेशन - केळवली रस्त्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार, याकडे आता केळवली परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.



