*देवरे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा,एक तास सामूहिक वाचन;विद्यार्थी,शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा,एक तास सामूहिक वाचन;विद्यार्थी,शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
*देवरे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा,एक तास सामूहिक वाचन;विद्यार्थी,शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
नंदुरबार(प्रतिनिधी):- श्री धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय,विखरण येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सलग एक तास वाचन करून वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. साळुंके, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षक सी. व्ही. नांद्रे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाचा विस्तार व्हावा आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने सामूहिक वाचन, पुस्तक परिचय आणि प्रेरणादायी विचारांचे वाचन असे उपक्रम घेण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे तीस मिनिटे विविध पुस्तके व साहित्याचे वाचन केले. या उपक्रमातून वाचन ही केवळ एक दिवसापुरती मर्यादित कृती नसून ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनावी, हा संदेश देण्यात आला.
प्रमुख पाहुणे सी. व्ही. नांद्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुस्तके ही माणसाची खरी मित्र असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर कमी करून अवांतर पुस्तके, थोर व्यक्तींची चरित्रे आणि प्रेरणादायी साहित्याचे नियमित वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी. डी. साळुंके म्हणाले, “वाचन ही केवळ ज्ञान मिळविण्याची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली आहे. नियमित वाचनामुळे ज्ञान, कल्पनाशक्ती,भाषिक कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी दररोज वाचनासाठी वेळ देऊन ज्ञानसमृद्ध, विचारशील आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व घडवावे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. शएस. मराठे यांनी केले, तर आभारप्रदर्शन वाय. डी.बागुल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एम. डी.नेरकर, डॉ.आर. आर. बागुल, ए.एस. बेडसे, एस.एच. गायकवाड, जे.एस. पाटील, एस.जी. पाटील, एच.एम. खैरनार आदींनी सहकार्य केले.



