*व्हेळ-मोगरगाव शाखेतर्फे पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा उत्साहात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*व्हेळ-मोगरगाव शाखेतर्फे पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा उत्साहात*
*व्हेळ-मोगरगाव शाखेतर्फे पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा उत्साहात*
लांजा(प्रतिनिधी):-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा व्हेळ-मोगरगाव यांच्या वतीने शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गाव मर्यादित पर्यावरणपूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा 2026 उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन आणि गावाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक विलास शिगम, द्वितीय क्रमांक नरेश शिगम आणि तृतीय क्रमांक विजय गाडे यांनी पटकावला. सुंदर व्हिडिओ प्रथम पारितोषिक श्री यशवंत लक्ष्मण पडीलकर (परिवार) द्वितीय क्रमांक गावकर वाडी आणि उत्तेजनार्थ मुगरुणवाडी यांना देण्यात आले विजेत्या स्पर्धकांचे शिवसेना व्हेळ- मोगरगाव शाखेतर्फे मनः पूर्वक अभिनंदन करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उमेश यशवंत पडीलकर, प्रकाश रामचंद्र बापर्डेकर, नरेश राम शिगम, सिद्धेश महादेव गाडे, केशव सोनू गुरव, गणपत कदम, संतोष पडीलकर, परशु शिगम, दत्ताराम काशीराम शिगम आणि नितेश काशीराम चिबडे या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. स्पर्धेचे परीक्षण संतोष बापाडेकर, हरेश कदम आणि राम शिगम यांनी केले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस, लांजा तालुका प्रमुख युवराज हांदे आणि युवा सेना विभाग अधिकारी भाई कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, मुंबईस्थित मंडळी, मान्यवर पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रविंद्र डोळस यांनी व्हेळ-मोगरगाव शाखेच्या उपक्रमाचे कौतुक केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईस्थित ग्रामस्थ मोठ्या संख्येने गावी येतात. अशा वेळी त्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणून मुंबईकर गावकरी यांच्यातील आपुलकीचे नाते आणि सामाजिक संवाद अधिक दृढ करण्याचे काम शाखेने केले आहे, असे त्यांनी नमूद केले. मोबाईल आणि धावपळीच्या युगात प्रत्यक्ष संवाद आणि माणुसकीची नाती काहीशी दुरावत चालली आहेत. पूर्वी मुंबईकर मंडळी गावी येण्याची गावकरी आतुरतेने वाट पाहत असत. या नात्यातील जिव्हाळा पुन्हा निर्माण करण्याचा सकारात्मक प्रयत्न या उपक्रमातून होत असल्याचे डोळस यांनी सांगितले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची संघटना ही कोणत्याही एका व्यक्तीच्या बळावर नव्हे, तर सर्वसामान्य शिवसैनिकांच्या निष्ठा, सहभाग आणि संघटनात्मक ताकदीवर उभी आहे, असे स्पष्ट करत त्यांनी या कार्यक्रमातील सर्व वयोगटांचा, विशेषतः युवा वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग अधोरेखित केला. समाज आणि देशाचे भवितव्य घडविण्यात युवा पिढीची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेचे कौतुक करताना बदलते हवामान आणि पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे उपक्रम काळाची गरज असल्याचे डोळस यांनी नमूद केले. त्याचबरोबर गावातील बंधुभाव, सामाजिक सलोखा आणि परस्परांतील आपुलकी वाढविणाऱ्या उपक्रमांचे सातत्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. एखादा उपक्रम सुरू करणे सोपे असते, मात्र तो वर्षानुवर्षे सातत्याने सुरू ठेवणे ही खरी कसोटी असते. त्यामुळे या उपक्रमात खंड पडू न देता तो अधिक व्यापक स्वरूपात पुढे न्यावा. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तालुका संघटना आवश्यक त्या सहकार्यासाठी सदैव पाठीशी राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच मुंबईकर आणि गावकरी यांच्यातील सामाजिक संवाद, आपुलकी आणि गावाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.



