*कात्री शाळेतील मद्यधुंद शिक्षकावर 7 दिवसांत कारवाई करा,अन्यथा युवा क्रांती संघटनेचा आमरण उपोषणाचा इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कात्री शाळेतील मद्यधुंद शिक्षकावर 7 दिवसांत कारवाई करा,अन्यथा युवा क्रांती संघटनेचा आमरण उपोषणाचा इशारा*
*कात्री शाळेतील मद्यधुंद शिक्षकावर 7 दिवसांत कारवाई करा,अन्यथा युवा क्रांती संघटनेचा आमरण उपोषणाचा इशारा*
नंदुरबार(प्रतिनिधी ):-धडगाव तालुक्यातील मौजे कात्री (सोलखडीपाडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक भरतसिंग पावरा हे कर्तव्यावर असताना वारंवार मद्यधुंद अवस्थेत हजर राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ मांडत आहेत. संबंधित गैरशिस्त शिक्षकावर येत्या 7 दिवसांत निलंबनाची व बदलीची कडक कारवाई न झाल्यास कात्री शाळेला टाळे ठोकून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा 'युवा क्रांती सामाजिक संघटना' व 'युवा क्रांती ग्राम समिती'च्या वतीने धडगावचे गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक हे शासकीय लोकसेवक असूनही शाळेच्या वेळेचे पालन न करणे, कर्तव्यावर गैरहजर राहणे आणि अध्यापन सोडून दारूच्या नशेत धुंद राहणे असे प्रकार सातत्याने करत आहेत. हे कृत्य 'महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम, 1967' मधील नियम 3 आणि नियम 26 (मद्यपान निषेध) चे थेट उल्लंघन करणारे आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी संबंधित शिक्षकास समज देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सुधारण्या ऐवजी अत्यंत अरेरावी व हिंसक भाषा वापरली. "तुम्ही माझे काही करू शकत नाही, धडगावमध्ये पाऊल ठेवू देणार नाही" अशा स्वरूपाच्या उघड धमक्या देत त्यांनी स्थानिक असल्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
साधारण 1 ते दीड महिन्यांपूर्वी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ शाळेत गेले असता, या शिक्षकाने एका नागरिकाच्या हातातील मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून फोडला व मारहाणीची दमदाटी केली. हे कृत्य भारतीय न्याय संहिता, 2023 अन्वये दखलपात्र गुन्हा ठरत असल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली जात आहे. शिक्षकाच्या या गैरवर्तनाचे व्हिडिओ व छायाचित्रांचे पुरावे प्रशासनाकडे सादर केले जाणार आहेत. या प्रकरणी भरतसिंग पावरा यांना 'महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, 1964' च्या नियम 3 अन्वये तात्काळ निलंबित करून त्यांची सखोल विभागीय चौकशी करण्यात यावी, शाळेतील वातावरण सुरक्षित राहण्यासाठी त्यांना कात्री शाळेतून तातडीने कार्यमुक्त करावे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी शाळेत त्वरित सक्षम पर्यायी शिक्षकाची नियुक्ती करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच विस्तार अधिकाऱ्यांमार्फत घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पालक व ग्रामस्थांचे रीतसर जबाब नोंदवून निष्पक्ष चौकशी अहवाल सादर करावा आणि वैयक्तिक संपत्तीचे नुकसान व धमक्या दिल्याप्रकरणी शिक्षकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण हा बालकांचा घटनात्मक मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे 7 दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास कात्री शाळेला टाळे ठोकून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, तसेच या दरम्यान उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागच पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देताना युवा क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाडवी, तालुका सचिव सुरेश वळवी, तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम समिती अध्यक्ष प्रविण वळवी, ग्राम समिती उपाध्यक्ष धीरसिंग वळवी, ग्राम समिती सचिव कांतीलाल वळवी, ग्राम समिती समन्वयक नरेंद्र वळवी तसेच सदस्य एकनाथ वळवी, गोविंद वळवी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



