*विलवडे रेल्वे स्थानकावरील एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यासह, सुविधांसाठी केलेल्या लाक्षणिक उपोषणाला 70 हून अधिक गावांतील प्रवाशांचा उत्स्फूर्त सहभाग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विलवडे रेल्वे स्थानकावरील एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यासह, सुविधांसाठी केलेल्या लाक्षणिक उपोषणाला 70 हून अधिक गावांतील प्रवाशांचा उत्स्फूर्त सहभाग*
*विलवडे रेल्वे स्थानकावरील एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यासह, सुविधांसाठी केलेल्या लाक्षणिक उपोषणाला 70 हून अधिक गावांतील प्रवाशांचा उत्स्फूर्त सहभाग*
लांजा(प्रतिनिधी):-विलवडे रेल्वे स्थानकावर अधिकाधिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, तसेच स्थानकावर प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण संघर्ष समितीच्या वतीने 20 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला परिसरातील 70 हून अधिक गावांतील रेल्वे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रवाशांचा वाढता आक्रोश आणि मोठ्या संख्येने झालेला सहभाग यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले. लांजा तालुक्याच्या पूर्व भागात तसेच लांजा-राजापूर तालुक्यांच्या सीमावर्ती परिसरात विलवडे रेल्वे स्थानक महत्त्वाचे प्रवासी केंद्र आहे. लांजा व राजापूर तालुक्यांतील अनेक गावांसह अणुस्कुरा घाटमाथ्यावरील तसेच वैभववाडी तालुक्यातील काही गावांतील नागरिक मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रवासासाठी या स्थानकावर अवलंबून आहेत. अशा 70 हून अधिक गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या स्थानकावर अपेक्षित प्रमाणात एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळत नसल्याने प्रवाशांची अनेक वर्षांपासून गैरसोय होत आहे. विलवडे स्थानकावर पुरेशा गाड्यांना थांबा नसल्यामुळे मुंबईसह अन्य शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांना अनेकदा पुढील स्थानकांवर जावे लागते किंवा गर्दीच्या गाड्यांमधून उभ्याने प्रवास करावा लागतो. काही वेळा वेळेची बचत करण्यासाठी अथवा आरक्षण उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांच्या प्रवासाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो. या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विलवडे स्थानकावर अधिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. याशिवाय, स्थानकावरील प्रवाशांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्नही गंभीर असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. स्थानकावर एकच फलाट असल्यामुळे गाडीत चढताना उतरताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच स्थानकावर उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालयाचा योग्य वापर होत नसल्याने त्याचीही दुरवस्था झाली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता, आसनव्यवस्था, निवारा यांसह आवश्यक सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व प्रश्नांकडे कोकण रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण संघर्ष समितीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाचे आयोजन केले होते. उपोषणाला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील असंख्य प्रवासी सहभागी झाले होते. परिसरातील नागरिक, रेल्वे प्रवासी आणि विविध गावांतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला. या आंदोलनात संघटनेचे मुंबई अध्यक्ष यशवंत जडयार, कार्याध्यक्ष रमेश काटकर, ग्रामीण अध्यक्ष अमोल रेडीज, सल्लागार सुभाष लाड यांच्यासह जगदीश राजापकर, गुरुप्रसाद देसाई, विनय गांगण, विश्वनाथ गुरव यांनी उपस्थितांना संबोधित केले.
विलवडे रेल्वे स्थानकाच्या प्रश्नांकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याने आता प्रवाशांनी संघटितपणे आवाज उठविला असून, एक्सप्रेस गाड्यांना थांबे, स्थानकाचा विकास आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपोषणाची दखल घेऊन कोकण रेल्वेचे आंबार्डेकर, अहिरे यांनी लांजा तहसीलदार श्रीमती ढोले यांच्या उपस्थितीत
शिष्ट मंडळाशी चर्चा करून प्रतिक्षागृह फलाटाला जोडून बांधणेव त्याच बाजूला रॅंप बांधणे, फलाटाला समतल असलेला मार्ग सुव्यवस्थीत करून तिथे दिव्यांची व्यवस्था ही कामे लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले. रस्त्यावरील दिव्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करणे, ड्रेनेजच्या उघड्या टाकीला बंदीस्त करण्याचे काम पुढील पंधरा दिवसांत पूर्ण केले जाईल असे सांगितले. दोन नंबरचे फलाट बांधण्याचा प्रस्ताव करुन पुढील महिन्यात त्याची माहिती देऊ असे सांगितले. तसेच रेल्वे मंत्रालयाकडे जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोच्युवेली तसेच मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांना विलवडे येथे थाबा देण्याबाबत पाठविलेल्या प्रस्तावाची सत्यप्रत दिली. यामुळे शिष्टमंडळाने तात्पुरते समाधान मानून उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला मात्र या गोष्टींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने रेल्वेची हालचाल दिसली नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्याचे जाहीर केले. विलवडे रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्तात आंदोलन यशस्वी पार पडले.महाराष्ट्र गीत विश्वनाथ आयरे यांनी सादर केले. आंदोलनाचे सूत्रसंचालन विजय हटकर व काशिनाथ चव्हाण यांनी केले.



