*कंपनीत नोकरी लावून देण्याचे बहाण्याने युवतीची फसवणुक करत तिची विक्री करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 5000 हजार रुपयांचा दंड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कंपनीत नोकरी लावून देण्याचे बहाण्याने युवतीची फसवणुक करत तिची विक्री करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 5000 हजार रुपयांचा दंड*
*कंपनीत नोकरी लावून देण्याचे बहाण्याने युवतीची फसवणुक करत तिची विक्री करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 5000 हजार रुपयांचा दंड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विसरवाडी पोलीस ठाण्याचे हद्दीतील चिंचपाडा, ता. नवापुर जि. नंदुरबार येथील पिडीत नामे xxxxxx, वय-19 वर्ष, ही नंदुरबार येथील एका नर्सिंग स्कुलमध्ये प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असतांना रोहीत महेंद्र वळवी रा. कोठली ता.जि. नंदुरबार याच्या सोबत ओळख झाली होती. रोहीतने पिडीतेस विश्वासात घेवून सांगितले की, "माझी नातेवाईक गुजरात येथे एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करते. तूही तेथील कंपनीत काम कर, तुलाही चांगला पगार मिळेल." नंतर रोहीत याने पिडीतेस रेल्वेने व्यारा येथे घेवून जावून तेथे पिडीतेची नेहा नामक महिलेसोबत ओळख करुन दिली होती व ती माझी नातेवाईक असल्याचे रोहीतने सांगितले होते. नेहा तुला चांगल्या कंपनीत नोकरीस लावून देईल असे आश्वासन देवून रोहीत पिडीतेस नेहाकडे सोडून निघून गेला होता. नंतर नेहाने पाटी गावातील भारती नामक महिलेसोबत पिडीतेची ओळख करुन देत, भारती तुला कंपनीत नोकरीस लावून देईल असे सांगत. नेहाने पिडीतेस भारतीच्या घरी सोडले होते.11 जून 2025 रोजी भारती ही पिडीतेस आहवा येथे कंपनीत नोकरी लावण्याचे बहाण्याने घेवून गेली होती. परंतु कंपनीत नोकरी न लावता भारतीने पिडीतेस दोन व्यक्तिंना दाखविले होते. तेव्हा पिडीतेने भारतीस विचारपूस केली असता भारतीने सांगितले की, "मी तुला विकत घेतले असून जास्त बोलशील तर मारुन टाकेल." अशी धमकी दिल्याने पिडीता घाबरुन गेली होती. भारतीने पिडीतेचे खोटया नावाचे बनावट आधारकार्ड बनवून किरीटभाई मार्फतीने पार्थ नामक मुलास दाखविले होते. दरम्यान काही गडबड केली तर जिवेठार करुन जंगलात फेकून देवू अशी धमकी पुन्हा भारतीने पिडीतेस दिली होती. पिडीतेचा पार्थ सोबत विवाह होणार असून ते तुला त्यांचे गावी घेवून जातील. तू जर गेली नाहीस तर तुला मारुन टाकू अशी धमकी भारतीने पिडीतेस पुन्हा देत गुजराथी भाषेत वकीलामार्फत पार्थ सोबत विवाह संपन्न झाल्याची नोटरी करुन घेतली होती. पार्थ याने पिडीतेस त्याचे घरी नडीयाद, आणंद गुजरात येथे नेल्यावर पार्थच्या कुटुंबियांना पिडीतेने तिचे खरे नाव व तिची सर्व खरी ओळख त्यांना सांगितली होती. पिडीतेस नोकरी लावून देण्याचे बहाण्याने खोटे आधारकार्ड बनवत तिचा विवाह पार्थसोबत तिची इच्छा नसतांना बळजबरीने लावून दिला आहे हे देखील पिडीतेने पार्थच्या कुटुंबियांना सांगितले होते. किरीटभाई याने पिडीतेचे विवाहकामी स्थळ दाखविल्याचे पिडीतेस पार्थचे कुटुंबियांकडून समजले होते.
तसेच विवाह लावून देण्याचे बदल्यात किरीट याने पार्थचे कुटुंबियांकडून 4 लाख रुपये घेतल्याची माहिती पिडीतेस मिळाली होती. वरील सर्व हकीकत पिडीतेस समजल्याने तिची खात्री झाली की, रोहीत महेंद्र वळवी, नेहा @ स्नेहा ललित वळवी, भारती @ हंसाबेन किशोरभाई गामीत, पार्थ अजयकुमार भाटिया अशांनी मिळून पिडीतेस किरीटभाई यास विवाह करण्यासाठी विकून दिले आहे. पिडीतेचा तपास करीत विसरवाडी पोलीसांनी पार्थच्या घरी येत पिडीतेस व पार्थला ताब्यात घेवून पोलीस ठाणे विसरवाडी येथे आणले होते. त्यावरुन विसरवाडी पोलीस ठाणे येथे वरील आरोपीविरुध्द गु.र.नं. 186/ 2025, भा.न्या.सं. क. 137(2),143, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील यांनी केला असून आरोपी पार्थ अजयकुमार भाटिया, वय-25 रा. अमेरीकन कॉलनी, मोटा महादेव रोड, नडीयाद जि. खेडा, रोहीत महेंद्र वळवी, वय-22 कोठली ता.जि. नंदुरबार, नेहा @ स्नेहा ललित वळवी वय-24, रा. साईनाथ कॉलनी, सचिन, सुरत, (गुजरात), 4) भारती @ हंसाबेन किशोरभाई गामीत, रा. पाटी ता. डोलवन जि. तापी, (गुजरात), 5) किरीटभाई सुलेमानभाई वणकर, वय-52 रा. 883 इंदीरानगर अलिंद्रा ता. नडीयाद, जि. खेडा (गुजरात) यांना तात्काळ अटक करत अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने सदर गुन्हयाचा तपास करुन महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपींविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र अति. जिल्हा सत्र न्यायालय, नंदुरबार येथे सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. सत्र न्यायाधीश, नंदुरबार ए. एच. सैय्यद यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, पंच, पिडीत मुलगी, डॉक्टर साक्षीदार, तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी पार्थ अजयकुमार भाटिया, रोहीत महेंद्र वळवी, नेहा @ स्नेहा ललित वळवी, भारती@ हंसाबेन किशोरभाई गामीत, किरीटभाई सुलेमानभाई वणकर यांच्याविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने पाचही आरोपींना अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार ए. एच. सैय्यद यांनी भा. न्या.सं.क.-137(2), 143,3(5) प्रमाणे अन्वये दोषी ठरवत प्रत्येकी 7 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 5 हजार रुपये रुपये दंड असा एकुण रुपये- 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच पिडीतेस 1 लाख रुपये मात्र रक्कम अदा करण्याचे आदेश देखील न्यायालयाने पारित केले आहेत.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. विजय सी. चव्हाण यांनी पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि योगिता राठोड, पैरवी अंमलदार पो.हे. कॉ./राजेंद्र गावीत, पो.कॉ. देवेंद्र पाडवी, म.पो.कॉ. दुर्गा वळवी आणि म.पो.कॉ. भावना पाटील यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार हनुमंत गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.



