*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार विद्यालयाची मॉडेल स्कूल म्हणून निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार विद्यालयाची मॉडेल स्कूल म्हणून निवड*
*एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,नंदुरबार विद्यालयाची मॉडेल स्कूल म्हणून निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) यांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच रोजगाराभिमुख व व्यवसायाभिमुख कौशल्यांचे शिक्षण देण्यावर विशेष भर दिला जात आहे. याच उद्देशाने इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची पायलट प्रकल्पासाठी निवड करण्यात आली असून, एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार या विद्यालयाची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात व्यावसायिक शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत TATA Tech, Stars Forum तसेच विज्ञान आश्रम, पाबळ आणि जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या माध्यमातून विद्यालयात व्होकेशनल एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर म्हणजेच व्यवसायिक शिक्षण प्रयोगशाळा मॉडेल लॅब उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे साहित्य आता विद्यालयात उपलब्ध झाले असून, लॅब प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहे.
या अत्याधुनिक व्यावसायिक शिक्षण प्रयोगशाळेत किचनशी संबंधित आवश्यक साहित्य व उपकरणे, गार्डनिंगसाठी लागणारी विविध साधने तसेच 'मशिन्स अँड मटेरियल्स' या कार्यक्षेत्रासाठी आवश्यक विविध प्रकारचे साहित्य आणि उपकरणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी स्वरूपात माहिती न देता, प्रत्यक्ष साहित्य हाताळून काम करण्याची आणि विविध कौशल्यांचे प्रात्यक्षिक अनुभवण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विकसित करण्यात आलेले कौशल्य बोध' हे इयत्ता 6 वी, 7 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठीचे प्रकल्पाधारित व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. “करून शिकणे” (Learning by Doing) या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, प्रयोग आणि प्रकल्पांच्या माध्यमातून विविध कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत.
'कौशल्य बोध'मधील प्रकल्प जीवसृष्टी (Life Forms), यंत्रे व साहित्य (Machines and Materials) आणि मानवी सेवा (Human Services) या तीन प्रमुख कार्यक्षेत्रांवर आधारित आहेत. स्थानिक गरजा, उपलब्ध संसाधने आणि समाजाशी निगडित विषयांवर प्रकल्प राबविताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. यामुळे समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता, उद्योजकता, संघभावना, नेतृत्वगुण आणि श्रमाची प्रतिष्ठा यांसारखी जीवनावश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार आहे.
विद्यालयात उपलब्ध झालेल्या लॅब साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंपाकाशी संबंधित मूलभूत कौशल्ये, बागकाम व रोपसंवर्धन, विविध वस्तू तयार करण्याचे तंत्र, साहित्याचा योग्य वापर, साधने व यंत्रांचे मूलभूत ज्ञान तसेच मानवी सेवेशी संबंधित उपयुक्त कौशल्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. विविध प्रकल्प पूर्ण करताना विद्यार्थी स्वतः काम करतील, प्रयोग करतील आणि तयार केलेल्या वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाला व्यवसायाभिमुख आणि जीवनोपयोगी दिशा मिळणार आहे. एस. ए. मिशन हायस्कूलमध्ये मॉडेल लॅबसाठी सर्व आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्यक्ष काम करून नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळत असल्याने विद्यार्थीही या उपक्रमात उत्साहाने सहभागी होण्यास सज्ज झाले आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध प्रकल्पांद्वारे रोजगाराभिमुख कौशल्ये, स्वयंरोजगाराची जाणीव आणि उद्योजकीय दृष्टीकोन विकसित करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वर्गखोली आणि पुस्तकांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष जीवन, काम आणि कौशल्यांशी जोडले जाणार आहे. भविष्यातील रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्याधारित करिअरसाठी आवश्यक असलेली प्राथमिक तयारी शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या संदर्भात विद्यालयाच्या प्राचार्या सौ. नूतन वर्षा राजेश वळवी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना सांगितले की, “विद्यालयात उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक NET मॉडेल लॅबचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा. विविध प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा आणि जास्तीत जास्त व्यवसायाभिमुख व जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करावीत. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून कौशल्य, सर्जनशीलता आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभवही तितकाच महत्त्वाचा आहे.”
नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणारा हा पायलट प्रकल्प आणि एस. ए. मिशन हायस्कूलमध्ये उभारण्यात आलेली ही मॉडेल लॅब भविष्यात जिल्ह्यातील तसेच राज्यातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.



