*उद्या जलसंधारण दिनानिमित्त ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उद्या जलसंधारण दिनानिमित्त ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन*
*उद्या जलसंधारण दिनानिमित्त ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’चे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात रुजविणे आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संदेशातून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी उद्या 21 ऑगस्ट 2026 रोजी जलसंधारण दिनानिमित्त नंदुरबार येथे ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी तसेच विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नंदुरबार येथील जी.टी.पी. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंधारणा बाबत व्यापक जनजागृती निर्माण करणे, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलसंवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या महावॉकेथॉनला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच लोकसभा सदस्य ॲड. गोवाल पाडवी, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, अमरीशभाई पटेल, किशोर दराडे व सत्यजीत तांबे, तसेच विधानसभा सदस्य डॉ. विजयकुमार गावित, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी आणि आमश्या पाडवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एस. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेशी जोडलेली अमूल्य संपदा आहे. बदलते हवामान, अनियमित पर्जन्यमान आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेता मृद व जलसंधारणाच्या उपाययोजनांबरोबरच त्याबाबत व्यापक लोकजागृती होणे आवश्यक आहे. ‘महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
जलसंधारण दिनानिमित्त आयोजित या महावॉकेथॉनमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक, युवक -युवती, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंवर्धनाच्या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



