*नरेश जावरेची भारतीय सैन्यदलात निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नरेश जावरेची भारतीय सैन्यदलात निवड*
*नरेश जावरेची भारतीय सैन्यदलात निवड*
शहादा(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील रहिवासी नरेश पुरुषोत्तम जावरे याची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याने संपूर्ण प्रकाशा गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. देशसेवेची संधी मिळाल्याबद्दल ग्रामस्थ, भोई समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी 26 जून रोजी बसस्थानकापासून भव्य मिरवणूक काढून नरेशचा जल्लोषात गौरव केला. नरेशचे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा, प्रकाशा येथे, तर पाचवीपासून महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण सोनगीर (जि. धुळे) येथे झाले. आठवीत असतानाच वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आईवर आली. मोलमजुरी व कष्ट करून आईने दोन्ही मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. याच जिद्द आणि चिकाटीच्या बळावर एस.वाय. मध्ये शिक्षण घेत असतानाच नरेशने सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेतले आणि 24 जून रोजी भारतीय सैन्यदलात त्याची निवड झाली.
या यशाबद्दल 26 जून रोजी प्रकाशा बसस्थानकापासून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. युवकांनी नरेशला खांद्यावर घेत जल्लोष केला. मिरवणूक भैरव चौकात आल्यानंतर त्याचा सामूहिक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शहादा प्रांताधिकारी दीपक गिरासे, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे, नगरसेविका लताबाई शिवदे, भोई समाज अध्यक्ष नरेंद्र वाडीले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध संस्था, सिद्धार्थ नवयुवक मंडळ, भोई समाज नवयुवक मंडळ तसेच प्रकाशा पत्रकार संघाच्या वतीने नरेशचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले की, "नरेश जावरे हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. मोबाईलवर वेळ वाया घालवण्याऐवजी तरुणांनी एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करून शासकीय सेवेत स्थान मिळवावे."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नरेंद्र गुरव यांनी केले, तर आभार पंकज वानखेडे यांनी मानले.



