*तृतीयपंथीयांच्या शिक्षणाला व स्वयंरोजगाराला नवी दिशा, शिष्यवृत्ती व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करावेत-सुंदरसिंग वसावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तृतीयपंथीयांच्या शिक्षणाला व स्वयंरोजगाराला नवी दिशा, शिष्यवृत्ती व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करावेत-सुंदरसिंग वसावे*
*तृतीयपंथीयांच्या शिक्षणाला व स्वयंरोजगाराला नवी दिशा, शिष्यवृत्ती व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करावेत-सुंदरसिंग वसावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या ‘सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाइव्हलीहुड अँड एंटरप्राइज (SMILE)’ या केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत तृतीयपंथीय व्यक्तींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी शिष्यवृत्ती योजना तसेच स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे. या योजनांमुळे तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळणार असून स्वयंरोजगारासाठीही भक्कम आर्थिक पाठबळ उपलब्ध होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीय व्यक्तींनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
तृतीयपंथीय समाजाला शिक्षण, रोजगार व उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याबरोबरच स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे तृतीयपंथीय व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. *शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कोणाला?*
या योजनेचा लाभ शासनमान्य अथवा खासगी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये इयत्ता 9 वीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. लाभार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक असून सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर जारी करण्यात आलेले तृतीयपंथीय ओळख प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. *शिष्यवृत्तींची संख्या मर्यादित*
असल्यामुळे लाभार्थ्यांची निवड मागील शैक्षणिक वर्षातील गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहे. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. *प्रतिवर्षी ₹13,500 पर्यंत शिष्यवृत्ती*
या योजनेंतर्गत प्री-मॅट्रिक (Pre-Matric) आणि पोस्ट-मॅट्रिक (Post-Matric) शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ₹13,500 पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागविणे सोपे होणार असून उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
*स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना*
तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना उद्योग, व्यवसाय व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात किमान 10 वर्षे वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थ्यांकडे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले तृतीयपंथीय ओळखपत्र असणे आवश्यक असून अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षांदरम्यान असावे. या योजनेंतर्गत 21 प्रकारच्या लघु व्यवसायांसाठी तसेच 12 प्रकारच्या व्यवसायांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या टूल किट (Tool Kit) खरेदीसाठीही कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. *₹2 लाखांपर्यंत कर्जाची सुविधा*
बीज भांडवल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन प्रकारच्या कर्ज योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये लघु कर्ज योजना (₹25,000 पर्यंत), मध्यम कर्ज योजना (₹50,000 पर्यंत) आणि दीर्घ कर्ज योजना (₹2,00,000 पर्यंत) यांचा समावेश आहे. अर्जदाराला यापैकी कोणत्याही एका कर्ज योजनेचा लाभ मिळू शकतो.
योजनेत लाभार्थ्यांचा हिस्सा 5 टक्के, शासन अनुदान 45 टक्के आणि उर्वरित 50 टक्के रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजावर 3 टक्के रिबेट (सूट) देण्यात येणार असल्याने आर्थिक भारही कमी होणार आहे.
*अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे*
बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करताना व्यवसायाचा परवाना, व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्य व यंत्रसामग्रीचे कोटेशन, व्यवसायासाठी स्वतःची जागा असल्यास त्याचा 7/12 उतारा किंवा जागा भाडेतत्त्वावर असल्यास भाडेकरारनामा, व्यवसायासंदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार कार्यालयात सादर करावीत. *अधिक माहितीसाठी*
योजनांबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, जिल्हा परिषद रोड, नंदुरबार येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.



