*बांधकाम कामगारांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बांधकाम कामगारांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन*
*बांधकाम कामगारांनी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र व नोंदीत बांधकाम कामगारांनी घ्यावा, असे जाहीर आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्रीमती मधुरा सूर्यवंशी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सामाजिक सुरक्षा योजना:
नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी 30 हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते.कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरिता 51 हजार रुपये एवढे अर्थसहाय्य दिले जाते. याशिवाय प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि कौशल्य वृद्धीकरण योजनांचा लाभ मिळतो. शैक्षणिक योजना (पहिल्या दोन पाल्यांसाठी): इयत्ता 1 ली ते 7 वी साठी प्रतिवर्ष रुपये 2 हजार 500 आणि 8 वी ते 10 वी साठी प्रतिवर्ष रुपये 5 हजार शैक्षणिक लाभ दिला जातो.
इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 50 टक्के किंवा अधिक गुण मिळाल्यास रुपये 10 हजार दिले जातात. इयत्ता 11 वी व 12 वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष रुपये 10 हजार अर्थसहाय्य दिले जाते.कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्ष रुपये 20 हजार दिले जातात. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष रुपये 1 लाख तर अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी आणि शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्ष रुपये 20 हजार व पदव्युत्तर पदविकेकरिता रुपये 25 हजार लाभ दिला जातो. पाल्यांना संगणकाचे शिक्षण एमएससीआयटी साठी शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते. अर्थसहाय्य योजना: बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास रुपये 5 लाख, तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास रुपये 2 लाख अर्थसहाय्य दिले जाते. कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता रुपये 10 हजार आणि त्याच्या विधवा पत्नी अथवा विधुर पतीस रुपये 24 हजार (5 वर्षांकरिता, प्रतिवर्ष अर्ज करणे आवश्यक) दिले जातात. घर खरेदी किंवा घरबांधणीसाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रुपये 6 लाख पर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा रुपये 2 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. आरोग्य विषयक व इतर योजना: पती किंवा पत्नीने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत 18 वर्षांपर्यंत रुपये 1 लाख मुदतबंद ठेव ठेवली जाते. कामगारास 75 टक्के अपंगत्व आल्यास रुपये 2 लाख अर्थसहाय्य दिले जाते. कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, तपासणी ते उपचार आरोग्य योजना लागू आहेत. दलालांना पैसे देऊ नका:
सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन मंडळामार्फत गृहउपयोगी वस्तू संच (भांडी संच), अत्यावश्यक संच, सुरक्षा संच (पेटी) व इतर योजनांचा लाभ पूर्णपणे निशुल्क देण्यात येत आहे. त्यामुळे या लाभासाठी कोणत्याही दलाल किंवा एजंटला अधिकचे पैसे देऊ नयेत, असेही सरकारी कामगार अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



