*आदिवासी युवा सेना संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी युवा सेना संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन*
*आदिवासी युवा सेना संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन*
शहादा(प्रतिनिधी):-संजय गांधी निराधार योजनेच्या शहादा कार्यालयातील संगणक लिपिक प्रेमसिंग गिरासे व इतर काही कर्मचाऱ्यांकडून एजंटमार्फत लाभार्थ्यांकडे पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप आदिवासी युवा सेना संघटनेने केला आहे. यासंदर्भात तहसीलदार, शहादा, उपविभागीय अधिकारी, शहादा तसेच जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, शहादा तालुक्यातील दलित, आदिवासी, गरीब, विधवा महिला, वृद्ध व अपंग नागरिक विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात येतात. मात्र काही लाभार्थ्यांनी कार्यालयातील संबंधित कर्मचारी व त्यांच्याशी संबंधित एजंटांकडून सही, शिक्का तसेच इतर शासकीय कामांसाठी पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार केली आहे. तसेच लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न करता त्यांची गैरसोय केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
आदिवासी युवा सेना संघटनेने म्हटले आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांना जनतेची सेवा करण्यासाठी शासनाकडून नियमित वेतन दिले जाते. अशा परिस्थितीत गरीब, गरजू, आदिवासी, दलित, विधवा, वृद्ध व अपंग नागरिकांकडून कोणत्याही शासकीय कामासाठी पैशांची मागणी करणे हे अत्यंत चुकीचे असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
संघटनेने पुढे म्हटले आहे की, भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार सर्व नागरिकांना कायद्यापुढे समानतेचा अधिकार आहे. कलम 21 प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रदान करते. तसेच कलम 39A नुसार आर्थिक किंवा सामाजिक दुर्बलतेमुळे कोणताही नागरिक न्याय व हक्कांपासून वंचित राहू नये, यासाठी समान न्यायाची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्याला देण्यात आले आहेत. त्यामुळे गरीब व गरजू लाभार्थ्यांकडून शासकीय कामांसाठी पैशांची मागणी होणे हे संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संबंधित एजंटांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी युवा सेना संघटनेने केली आहे. दरम्यान, कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी तसेच कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा मानसिक त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिलीप एस. महिरे तालुका दलित अध्यक्ष,
किरण ठाकरे तालुका युवा अध्यक्ष, सुनिल पवार सोशल मीडिया प्रमुख,
राजेश ठाकरे कार्यकर्ता, रोहित पवार कार्यकर्ता,
दीपक पाडवी कार्यकर्ता, विशाल नवरत, सुनिल भिल तसेच आदिवासी युवा सेना संघटनेचे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



