*रायपाटणला मंदिराचे गाव म्हणून मान्यता देण्याची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रायपाटणला मंदिराचे गाव म्हणून मान्यता देण्याची मागणी*
*रायपाटणला मंदिराचे गाव म्हणून मान्यता देण्याची मागणी*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील रायपाटण हे गाव इतिहास, कला, अध्यात्म, निसर्ग आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध संगम ठरले असून, गावातील विविध पुरातन आणि जागृत मंदिरांमुळे ‘मंदिरांचे गाव’ म्हणून राज्य पातळीवर रायपाटणची व्यापक स्वरूपात ओळख होणे आवश्यक असून त्यादृष्टीने प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
इतिहास कालखंडात ‘राजपट्टण’ म्हणून ओळख असलेले रायपाटण गाव आजही आपल्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचे जतन करत आहे. गावात सुमारे वीसहून अधिक विविध देवतांची मंदिरे आहेत. त्यामध्ये संगनाथेश्वर (संगोबा) हे प्राचीन शिवमंदिर विशेष महत्त्वाचे मानले जाते. मंदिराच्या पुढील भागात एक शिलालेख समस्त भाविकांचे लक्ष वेधून घेतो. त्यानुसार शके 1664 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचा उल्लेख त्या शिलालेखावर आढळतो. या मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करताना निर्माण होणारा ‘सिंहनाद’ हा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा आणि श्रद्धेचा विषय मानला जातो. या मंदिराला रोचक असा इतिहास आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भाविकांची मंदिरात गर्दी लोटले.
गावचे ग्रामदैवत श्री वडची आई माता ही 13 खेड्यांची मालकीण म्हणून या देवतेची ओळख आहे तिचा महिमा अपार आहे. या मंदिराला देखील जाज्वल्यमान असा इतिहास आहे. निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे मंदिर विशेषतः श्रावण महिन्यात हिरवाईने नटून निसर्ग सौंदर्याचा जबरदस्त अनुभव देत असते. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिर अधिक आकर्षक बनले आहे.अत्यंत देखणे मंदिर म्हणून सर्वांना भुरळ घालते. मंदिरातील शांतता खूप आनंद देते.
याशिवाय गावातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर सुमारे तीनशे वर्षांहून जुने असून सध्या त्याचा सध्या जीर्णोद्धार सुरू आहे. त्याच परिसरात दत्तमंदिर, श्रीराम मंदिर, मारुती मंदिर तसेच स्वतंत्र हनुमान मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. संगनाथेश्वर मंदिर परिसरात रामेश्वर मंदिर आणि रेवणसिद्ध मठ अर्जुना नदीच्या तीरावर वसलेले असून, शांततेचा भंग करीत अविरतपणे वाहणारा अर्जुना नदीचा खळखळाट आणि सभोवतालची वनराई या ठिकाणाला अधिक आध्यात्मिक शांतता प्रदान करतात.
गावातील अन्य महत्त्वाच्या मंदिरांमध्ये श्री रवळनाथ मंदिर, ओणी-अणूस्कुरा मार्गावरील माता एकवीरा मंदिर, शेटे वसाचे मंदिर,नाटा देवी मंदिर, मोनेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, वीरभद्र मंदिर, मोतादेवी मंदिर, (खाडेवाडी) दत्तमंदिर (बांबरकर वाडी )श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, खालील टक्केवाडी, गणपती मंदिर, भावका देवी मंदिर, तसेच विविध वाड्यांमधील लहान -मोठी देवस्थाने यांचा समावेश आहे. गावच्या सामाजिक इतिहासाचा भाग असलेले एक पुरातन मंदिर देखील जीर्णवस्थेत पहावयास मिळते. या सर्व मंदिरांमुळे रायपाटण गावाचा धार्मिक आणि सांस्कृतिक पट अत्यंत समृद्ध बनला आहे.
रायपाटणमधील उत्सव परंपराही तेवढ्याच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गावातील मध्यवर्ती होळीचा मांड येथे साजरा होणारा पंधरा दिवसांचा होलीकोत्सव तालुका व जिल्हाभर प्रसिद्ध आहे. वर्षभर विविध मंदिरांमध्ये होणारे उत्सव, यात्रा आणि धार्मिक कार्यक्रम यामधून गावाची सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि सामाजिक एकात्मता अनुभवायला मिळते. गावातील बौद्धवाडीतील बौद्धविहार देखील सामाजिक-सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक आहे. रायपाटण मधील मंदिरांची परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसंपन्न वातावरण लक्षात घेता या गावाला ‘मंदिरांचे गाव’ म्हणून मान्यता मिळाल्यास अध्यात्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते.
यासाठी शासन व पर्यटन विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने पायाभूत सुविधा, प्रसिद्धी आणि संवर्धन यावर भर दिल्यास रायपाटणची ओळख राज्यासह देशपातळीवर पोहोचण्यास मदत होईल. धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन गावाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.भक्कम इतिहास असलेल्या रायपाटण गावच्या विकासासाठी चांगली संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न होणे आवश्यक बनले आहे.



