*संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त “ज्ञानियांचा राजा” विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा वारसा जतन करत अभंग, भजन आणि प
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त “ज्ञानियांचा राजा” विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा वारसा जतन करत अभंग, भजन आणि प
*संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त “ज्ञानियांचा राजा” विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा वारसा जतन करत अभंग, भजन आणि प्रबोधनातून समाजजागृतीचा संदेश; 18 मे रोजी नंदुरबार येथे कार्यक्रमाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या मालिकेत नंदुरबार येथे “ज्ञानियांचा राजा” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम सोमवार, 18 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला असून, जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, वारकरी बांधव आणि संत साहित्य अभ्यासकांमध्ये कार्यक्रमाबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ या महान ग्रंथाद्वारे भगवद्गीतेचा अध्यात्मिक संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत सोप्या मराठी भाषेत पोहोचविला. समता, मानवता, भक्ती आणि बंधुभाव यांचा संदेश देत त्यांनी समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही समाजमनावर अधोरेखित होत असून, वारकरी संप्रदायातील त्यांचे योगदान अमूल्य मानले जाते. या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांद्वारे संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच समाजात सकारात्मक संस्कार आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणे हा प्रमुख उद्देश आहे. “ज्ञानियांचा राजा” या कार्यक्रमातून अध्यात्म, संस्कृती आणि समाज प्रबोधनाचा संदेश प्रभावीपणे मांडला जाणार आहे. या कार्यक्रमात प्रख्यात व्याख्याते तथा स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार गणेश शिंदे व सहकलाकार यांचा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून, त्यांचे प्रबोधनपर व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानातून संतांच्या विचारांचा आधुनिक समाजाशी असलेला संबंध, अध्यात्मिक दृष्टिकोन आणि समाजजागृतीतील योगदान यांचा सखोल उलगडा होणार आहे. तसेच अभंग, भजन आणि समाजप्रबोधनपर सादरीकरणांतून उपस्थितांना भक्तिमय व प्रेरणादायी अनुभव मिळणार आहे. सदर कार्यक्रम ॲड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून, संतपरंपरेचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक ओळख अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. नंदुरबार व परिसरातील नागरिक, वारकरी बांधव, विद्यार्थी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.



