*“महाराष्ट्र दिनी तऱ्हाडी शाळेत ‘आनंदाची तऱ्हाडी’ स्मरणिका प्रकाशन; प्रवेशोत्सवात उत्साहाचा जल्लोष”*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*“महाराष्ट्र दिनी तऱ्हाडी शाळेत ‘आनंदाची तऱ्हाडी’ स्मरणिका प्रकाशन; प्रवेशोत्सवात उत्साहाचा जल्लोष”*
*“महाराष्ट्र दिनी तऱ्हाडी शाळेत ‘आनंदाची तऱ्हाडी’ स्मरणिका प्रकाशन; प्रवेशोत्सवात उत्साहाचा जल्लोष”*
शहादा(प्रतिनिधी):-महाराष्ट्र दिन निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तऱ्हाडी ता. बो., येथे देशभक्ती, शिक्षण आणि नव्या शैक्षणिक वाटचालीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. भारतीय तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण, “आनंदाची तऱ्हाडी” या वार्षिक स्मरणिकेचे प्रकाशन तसेच इयत्ता पहिली प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांद्वारे महाराष्ट्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यानंतर शाळेची “आनंदाची तऱ्हाडी” ही वार्षिक स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. स्मरणिकेमध्ये शाळेतील वर्षभरातील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची मनोगते, शिक्षकांचे विचार, विविध उपक्रमांचे वृत्तांत आणि छायाचित्रांमुळे स्मरणिका अधिक समृद्ध झाली आहे. उपस्थित पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख अशोक देवरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. “ही स्मरणिका विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आणि शिक्षकांच्या मेहनतीचा जिवंत दस्तऐवज आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना आनंददायी व भीतीमुक्त शिक्षण मिळावे यासाठी विविध शैक्षणिक स्टॉल उभारण्यात आले होते. चित्र ओळखा, रंग जुळवा, अक्षर ओळख, संख्या खेळ, गोष्टी व हालचाल आधारित उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. खेळातून शिकण्याच्या या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येत होता. पालकांनीही या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.मुख्याध्यापक शांतीलाल अहिरे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मीपुत्र उप्पीन यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक शांतीलाल अहिरे यांनी मानले.



