*कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या पंखांना ‘भविष्यवेध’चे बळ! मुंबईत करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या पंखांना ‘भविष्यवेध’चे बळ! मुंबईत करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न*
*कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या पंखांना ‘भविष्यवेध’चे बळ! मुंबईत करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न ‘कुणबी युवा मुंबई’ सलग्न शिक्षण विभाग यांच्या वतीने रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी परळ येथील कुणबी ज्ञातीगृह (वाघे हॉल) मध्ये ‘भविष्यवेध: करिअर मार्गदर्शन शिबिराचे' यशस्वी आयोजन करण्यात आले. समाजातील विद्यार्थ्यांनी आताच्या डिजिटल आणि स्पर्धेच्या युगात योग्य दिशा निवडून यशाचे शिखर गाठावे, या उद्देशाने आयोजित या शिबिराला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ठाणे येथील संबोधी करिअर अकॅडमीचे संचालक सन्माननीय मंगेश बोरकर सर यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी केवळ पारंपरिक पदवी शिक्षणावर मर्यादित न राहता UPSC, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षा, आधुनिक क्षेत्रांतील करिअर संधी आणि व्होकेशनल कोर्सेसची सविस्तर माहिती दिली. "मुलांच्या आवडीनुसार करिअर निवडताना पालकांनी त्यांना दडपण न देता पाठबळ द्यावे," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रश्नोत्तरांच्या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे अत्यंत सोप्या भाषेत निरसन केले.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपणाला काय करावे हे 10 वी आणि 12 वी नंतरच विचार न करता त्याची तयारी 5 वी ते 7 वी पासूनच व्हायला हवी असे कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. दिपिका आग्रे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कुणबी युवा मुंबईचे युवाध्यक्ष युवराज कांबळे यांनी आपल्या मनोगतातून तरुणांना संघटित होऊन प्रगती करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विभागाचे प्रमुख निलेश कुळये यांनी केले. प्रास्ताविकात युवासचिव सचिन रामाणे यांनी शिबिराची भूमिका स्पष्ट करून युवकांनी शिबिरात सहभाग घेतला पाहिजे त्यातून येणाऱ्या काळातील दशा आणि दिशा समजते असे मत व्यक्त केलं. तर शिक्षण विभागाचे सदस्य शशांक रांगळे आणि प्रचारक निळकंठ शां. तांबे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, युवा पदाधिकारी, तालुका शाखा आणि निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या प्रामाणिक सहकार्यामुळेच हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वी पद्धतीने संपन्न झाला. शिक्षणातून क्रांती आणि करिअरमधून प्रगती, हाच मंत्र घेऊन 'भविष्यवेध' शिबिराने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी केली आहे.



