*संविधानाच्या मूल्यांचा उत्सव नंदुरबार येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संविधानाच्या मूल्यांचा उत्सव नंदुरबार येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न*
*संविधानाच्या मूल्यांचा उत्सव नंदुरबार येथे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-संविधान ज्ञान परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ 18 एप्रिल रोजी जीवान विद्या, नंदुरबार येथे रोटरी क्लब ऑफ नंदुरबार आणि सलोखा समिती, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
नंदुरबार तालुक्यातील दहा शाळांमधील सुमारे 2000 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 240 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, “We the People of India” ही संविधानावरील पुस्तके आणि पेन देऊन गौरविण्यात आले. मुख्य अतिथी दादाभाई पिंपळे यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात त्याच्या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचे अध्यक्ष फादर टेनी यांनी विद्यार्थ्यांनी जबाबदार आणि जागरूक नागरिक बनावे, असे मार्गदर्शन केले.
जीवान विद्या यांच्या संचालिका सिस्टर जॅकलिन यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वंदना समुद्रे यांनी केले, तर श्रीमती रंजना क्नेहरे यांनी संविधानाच्या महत्त्वावर भाष्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली. चुनिलाल आणि लोकशाहीर पथकाने जनजागृतीपर गीत सादर केले, तर जीवान विद्या बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य, प्रार्थना नृत्य आणि संविधानावर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचा समारोप श्रीमती भारती चौधरी यांच्या आभार प्रदर्शनाने आणि राष्ट्रगीताने झाला.
या कार्यक्रमाला रोटेरियन डॉ. निर्मल गुजराती, दीपक शाह, एच. आर. महाजन, करनसिंह सिसोदिया, योगेश थोरात आणि पीटर चिन्नप्पा उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख म्हणून देवेंद्र उपासनी यांनी कार्यभार सांभाळला. या कार्यक्रमाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यास यश मिळाले.



