*लाखापूर विद्यालयात होळी उत्सव उत्साहात, आदिवासी परंपरेचा गौरव,‘व्यसनमुक्त होळी’तून जनजागृती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाखापूर विद्यालयात होळी उत्सव उत्साहात, आदिवासी परंपरेचा गौरव,‘व्यसनमुक्त होळी’तून जनजागृती*
*लाखापूर विद्यालयात होळी उत्सव उत्साहात, आदिवासी परंपरेचा गौरव,‘व्यसनमुक्त होळी’तून जनजागृती*
तळोदा(प्रतिनिधी):-माध्यमिक विद्यालय लाखापूर येथे होळी उत्सवानिमित्त विविध पारंपरिक पेहराव परिधान करून विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचा अनोखा वारसा जपण्याचा सुंदर संदेश दिला. या वेळी गावात भावा / गेर म्हणून फिरणाऱ्या बांधवांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करून त्यांच्या परंपरेचा गौरव करण्यात आला. या वेषभूषा जरी साध्या आणि सोप्या दिसत असल्या तरी त्यामागे खोल धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला असतो. अनेक श्रद्धाळू हा नवस सलग पाच वर्षे पूर्ण करतात. या काळात भर उन्हातही खाटेवर न बसणे, अंगावर पाणी न पडू देणे, तहान-भूक आणि उष्णतेचा सामना करत गावोगावी पायी फिरणे असे कठोर नियम पाळले जातात. अशा कष्टमय परंपरेतून आदिवासी समाज आपल्या संस्कृतीचे जतन करत पूर्वजांच्या श्रद्धेला मान देतो.
यावेळी विद्यालयात “व्यसनमुक्त होळी” हा अभिनव उपक्रमही राबवण्यात आला. शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन समाजातील दुर्गुणांविरुद्ध जनजागृती केली. भ्रष्टाचार, दृष्ट प्रवृत्ती, वाईट विचार, मत्सर, सिगारेट, दारू, क्रोध, अहंकार, लोभ आदी दुर्गुणांविरुद्ध विद्यार्थ्यांनी स्वतः घोषवाक्ये तयार करून प्रतीकात्मक स्वरूपात त्यांचे होळीत दहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या हस्ते होळी व ढोल पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सांस्कृतिक परंपरेचा सन्मान आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. तसेच मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी प्रास्ताविकेतून व्यसनमुक्तीपर संदेश दिला. याप्रसंगी व्यसनमुक्तीच्या संदेश देणारे पोस्टर उपशिक्षक फिरोजअली सय्यद, मंगल पावरा, सुवर्णा कोळी, यांनी बनवण्यासाठी परिश्रम घेतले.



