*हॉकी प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना शरीरविज्ञानशास्त्राबाबत मार्गदर्शन-सुनंदा पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हॉकी प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना शरीरविज्ञानशास्त्राबाबत मार्गदर्शन-सुनंदा पाटील*
*हॉकी प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंना शरीरविज्ञानशास्त्राबाबत मार्गदर्शन-सुनंदा पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या जिल्हा क्रीडा हॉकी प्रशिक्षण केंद्रामार्फत हॉकी खेळाडूंसाठी शासकीय निवासी इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार येथे 9 फेब्रुवारी 2026 रोजी विशेष चर्चासत्राचे आयोजन करुन शरीरविज्ञानशास्त्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रसार आणि जोपासना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देशातील पहिले क्रीडा धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करता यावी, यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. या कार्यक्रमासाठी प्राचार्या ज्योती निरभवणे अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक असून तो कधीही आयुष्यातून दूर करू नये निरोगी आणि सकस जीवनासाठी प्रत्येकाने दररोज किमान वीस मिनिटे नियमित व्यायाम करावा तसेच, वर्षातून दोन ते तीन वेळा विद्यार्थी व खेळाडू यांना फिजिओथेरपीचे सत्र घेण्याबाबत त्यांनी सूचना केली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहाद्याचे तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी केले. खेळाडूंच्या जीवनात फिजिओथेरपीला अत्यंत महत्त्व असून, खेळादरम्यान होणाऱ्या दुखापती (इंज्युरी) मुळासकट दूर करण्यासाठी तसेच योग्य पुनर्वसनासाठी फिजिओथेरपी आवश्यक आहे, असे सांगून सातत्यपूर्ण कामगिरी आणि दीर्घकालीन यशासाठी खेळाडूंनी फिजिओथेरपीचा नियमित अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या चर्चासत्रामध्ये मुख्य मार्गदर्शिका म्हणून फिजिओथेरपिस्ट डॉ. मानसी कटारिया यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. योग्य न्यूट्रिशन आणि डायेटचे महत्त्व पटवून देताना त्यांनी सांगितले की, योग्य आहार, पाणी सेवन, आहारातील घटकांचे प्रमाण आणि वेळेवर आहार घेतल्यास खेळाडूची कामगिरी, रिकव्हरी व फिटनेस कसा सुधारतो. खेळाडूंनी फक्त सरावावर नाही, तर आहारावरही तितकेच लक्ष द्यावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. इंज्युरी प्रिव्हेन्शन, स्ट्रेचिंग, अॅथलिट रिकव्हरी, फिजिओथेरपीमुळे खेळाडूच्या सातत्यामागील रहस्य तसेच दीर्घकालीन परफॉर्मन्ससाठी फिजिओथेरपीचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (डेमो) करून दाखवून खेळाडूंना योग्य व्यायाम व तंत्र समजावून सांगितले आणि खेळाडुकडून काही प्रात्यक्षिके करूनही घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेचे उपप्राचार्य विठ्ठल वायझोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार, क्रीडा अधिकारी ओमकार जाधव तसेच कल्पेश बोरसे व शाळेतील मिलीन पवार, कविता पाटील आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमास खेळाडू व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



