*कुष्ठरोग निर्मूलनासाठी ‘स्पर्श’ जनजागृती अभियान व ‘कुसुम’ विशेष मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान जिल्हाभर व्यापक उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुष्ठरोग निर्मूलनासाठी ‘स्पर्श’ जनजागृती अभियान व ‘कुसुम’ विशेष मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान जिल्हाभर व्यापक उपक्रम*
*कुष्ठरोग निर्मूलनासाठी ‘स्पर्श’ जनजागृती अभियान व ‘कुसुम’ विशेष मोहीम 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान जिल्हाभर व्यापक उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अंतर्गत ‘कुसुम’ विशेष मोहीम डॉ मित्ताली सेठी जिल्हाधिकारी व नमन गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहे. भेदभाव समाप्त करू या, सन्मानाची वागणूक देऊ या” हे स्पर्श जनजागृती मोहीम 2026 चे घोषवाक्य असून, कुष्ठरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करणे, भेदभाव कमी करणे, लवकर निदान व वेळेवर उपचाराचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
कुष्ठरोगाविषयी समाजात अजूनही भीती, गैरसमज व कलंक दिसून येतो. याचा परिणाम रुग्णांच्या सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व व्यावसायिक जीवनावर होतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी स्पर्श अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट, तरुण मंडळे, बाजारपेठा, आरोग्य मेळावे, नुक्कड नाटके, प्रभात फेऱ्या, मॅरेथॉन, वकृत्व-चित्रकला- रांगोळी- स्पर्धा व प्रदर्शन तसेच माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. याच कालावधीत शाश्वत विकास ध्येय 2027 अंतर्गत शून्य कुष्ठरोग प्रसार साध्य करण्यासाठी ‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे नियमित सर्वेक्षणातून वंचित राहणारे घटक — जसे की स्थलांतरित कामगार, बांधकाम मजूर, चिरेखाण कामगार, कारखान्यातील कामगार, कारागृहातील कैदी, आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी, वीट भट्टी कामगार आदींचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 312 अतिसंवेदनशील भागामध्ये 75187 नागरिकांची 223 टीम द्वारे आशा व पुरुष स्वयंसेवकांच्या मदतीने संशयित रुग्णांची त्वरीत तपासणी व संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निदान व उपचार सुरू करून संसर्गाची साखळी खंडित करण्यावर भर देण्यात येणार आहे. सहवासितांची तपासणी करून पात्र व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधोपचार (केमोप्रोफायलॅक्सिस) देण्यात येणार आहेत, अशी माहिती कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ.महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. शरीरावर कोणताही लालसर फिकट बधिर (संवेदना नसलेला )चट्टा, तेलकट गुळगुळीत चकाकणारी त्वचा तसेच कानाच्या पाळीवर व शरीरावर गाठी येणे, हाताच्या बोटांमध्ये व पायाच्या पंज्यांमध्ये अशक्तपणा व कमजोरी येणे अशी कुष्ठरोगाची लक्षणे आहेत. लवकर निदान व लवकर उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, विकृती टाळता येते आणि रुग्णांचे सामाजिक पुनर्वसन सुलभ होते, हा महत्त्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे यांनी केले आहे.



