*वंदे मातरम ने दिली असंख्य भारतीयांना स्फूर्ती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वंदे मातरम ने दिली असंख्य भारतीयांना स्फूर्ती*
*वंदे मातरम ने दिली असंख्य भारतीयांना स्फूर्ती*
नंदूरबार(प्रतिनिधी):-वंदे मातरम् केवळ एक गीत नसून तो असंख्य भारतीयांचा वेदमंत्र आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेक देशभक्तांना प्रेरणा देण्याचे, जाज्वल्य राष्ट्रभक्ती जागविण्याचे काम वंदे मातरमने केले आणि आजही वंदे मातरम तितकेच प्रासंगिक आहे असे प्रतिपादन एकलव्य विद्यालयाचे शिक्षक संतोष पाटील यांनी केले. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज एकलव्य विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर होत्या.
आपल्या संबोधनात संतोष पाटील यांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास सांगितला. ते म्हणाले की कोणत्याही आंदोलनात एखादी विशिष्ट घोषणा, एखादे विशेष गीत त्या आंदोलनाला चालना देत असते, लोकांमध्ये स्फूर्ती निर्माण करत असते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ही भूमिका वंदे मातरम या गीताने निभावली. जगाच्या पाठीवर भारत माता म्हणणारा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे मातृभूमीला वंदन करणाऱ्या वंदे मातरम या गीतात भारत मातेचे वर्णन आहे. असंख्य क्रांतिकारकांनी वंदे मातरम् म्हणत आपल्या प्राणांची आहुती दिली. केवळ वंदे मातरम् शब्द उच्चारल्यावर ब्रिटिश सरकार खटला दाखल करत असे इतका त्यांना या मंत्राचा धाक होता असे प्रतिपादन त्यांनी केले. आज आपल्याला वंदे मातरम् चे महत्व जाणून घ्यायचे असेल तर त्याचा इतिहास वाचला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे संगीत शिक्षक रश्मिकांत त्रिवेदी यांनी विद्यार्थ्यांकडून संपूर्ण वंदे मातरम गीत म्हणवून घेतले.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, ज्येष्ठ शिक्षक धर्मेंद्र मराठे, टिका पाडवी, मिलिंद वडनगरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीशंकर धुमाळ यांनी केले तर आभार मेधा गायकवाड यांनी मानले.



