*पुरस्कारप्राप्तीचा क्षण–अंतर्मनाच्या ज्योतीचा उजास*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पुरस्कारप्राप्तीचा क्षण–अंतर्मनाच्या ज्योतीचा उजास*
*पुरस्कारप्राप्तीचा क्षण–अंतर्मनाच्या ज्योतीचा उजास*
ठाणे(प्रतिनिधी):-कार्यक्रमादिवशी सकाळपासूनच मनात एक सुस्वर निनादत होत. ना तो अहंकाराचा, ना अतिउत्साहाच.
फक्त एवढंच एका ठाम पण सौम्य ध्वनीत "आज मला माझ्या शब्दांमुळे, माझ्या लेखणीच्या श्रमांमुळे सन्मानित केलं जाणार आहे." मनाच्या गाभाऱ्यातून नकळत डोळ्यांसमोर तरळून गेलं माझी बुरंबेवाडी माझं गाव देवाचे गोठणे. त्याच्या मातीत रुजलेली माझी बालपणाची गवताची पानं, ओलसर मातीचा सुगंध, आणि शब्दांच्या पहिल्या पालव्या—त्या क्षणाला जणू माझ्या आतून पुन्हा एकदा उमलून आल्या. शेवंता, देवमाणूस, माझे गाव देवाचे गोठणे, बुरंबेवाडीतील माझे बालपण, लढाई, सुक्या झाडाला मोहोर, शाहिर नवाळे. ही शिर्षकं नव्हती, त्या माझ्या आयुष्यातल्या रक्त-घामाने लिहिलेल्या आत्मगाथा होत्या.
‘आनंद विविध गुरुकुल’ या संस्कारांची सुगंधी सभागृहात उपस्थित होते साहित्याचे साक्षीदार अध्यक्ष, समर्पित पाहुणे आणि हृदयातून शब्द जपणारे रसिक वाचक. माझं नाव पुकारलं गेलं. आणि मी पुढे सरकलो. त्या क्षणी पाठीवरून नकळत आईचा हात फिरल्यासारखं वाटलं. आणि कुठेतरी मागे उभा असलेला बाप गालातल्या गालात हसतोय, हे स्पष्ट जाणवलं. हातात देण्यात आलं प्रमाणपत्र, एक हिरवं रोपटं आणि स्मृतिचिन्ह. त्या रोपट्याकडे पाहिलं. आणि अंतर्मनात शांततेनं उमटलं "हे केवळ रोप नाही, हे माझ्या लेखणीचं बीज आहे–जे काळाच्या वाळवंटातही पालव फोडेल, आणि नव्या माणुसकीचा वृक्ष बनवेल." त्या रोपट्याच्या स्पर्शात मला जाणवला माझ्या शब्दांचा स्वेद, त्या प्रमाणपत्राच्या कडांवर मला उमटलेली दिसली गावातली काळी जमीन. आणि त्या स्मृतिचिन्हात दडलेली वाटली आईच्या पदराची गंधाळलेली ओल.
पाठीवरून अनेकांचे शाबासकीचे हात होते. पण मला जाणवलं आज मी जिंकलेलो नाही, मी पुन्हा एकदा ऋणी झालोय.त्या प्रत्येक शब्दाचा. त्या प्रत्येक वेदनेचा. त्या प्रत्येक वाचकाचा, ज्यांनी माझं लेखन केवळ वाचलं नाही, तर जगलं. साहित्य म्हणजे केवळ वाक्यांची ओळ नव्हे ते असतं संवेदनांचं अवघं विश्व!ते असतं मूल्यांचा गाभा आणि माणूसपणाचा ठाव. जे मी लिहिल. ते आधी जगावं लागलं उपासमार, दुःख, स्त्रीमनाचं कुळकुळतं पाणी, आणि तरुणांच्या डोळ्यातली ओल या सगळ्याचं जीवनातून उतरलेलं लेखनच आज पदकाच्या रूपात परत भेटलं. कार्यक्रम संपला मंचाच्या प्रकाश - झोताखालील उत्सव मागे पडला पण मनाच्या कुशीत एक वाक्य घोघावत राहत."शब्दांचा पाया मजबूत असेल, तर साहित्याचं आकाश कोसळत नाही!" हा सन्मान म्हणजे यशाचा शेवट नाही तर तो आहे नव्या संकल्पाचा आरंभ. नवीन वाटा, नव्या मांडण्या, नव्या पिढीशी नव्या भाषेत संवाद साधण्याची नवी ऊर्जा हे या सन्मानानं मला दिलेलं अदृश्य पण प्रखर दायित्व आहे.
आता शब्द फक्त लिहायचे नाहीत ते इतके प्रामाणिक, इतके जिवंत असावेत–की वाचणाऱ्याला स्वतःचं आयुष्य बदलून टाकावंसं वाटावं. शरद यशवंत नवाळे लेखक, कवी, मु.पो. देवाचे गोठणे बुरंबेवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी.