*नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्यात पहिले विमान घेणार "टेक ऑफ",जगातील सर्वात जलद"बॅग क्लेम"प्रणाली होणार कार्यान्वित- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्यात पहिले विमान घेणार "टेक ऑफ",जगातील सर्वात जलद"बॅग क्लेम"प्रणाली होणार कार्यान्वित- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्यात पहिले विमान घेणार "टेक ऑफ",जगातील सर्वात जलद"बॅग क्लेम"प्रणाली होणार कार्यान्वित- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
रायगड(प्रतिनिधी):-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम सिस्टीम" विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे, अशी सूचना आज मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना येथे दिली. सद्य:स्थितीत या विमानतळाचे 94 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करून पहिले प्रवासी विमान उडणार, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतीपथावरील कामाची पाहणी करण्यासाठी आज या ठिकाणी आले असता ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किसन जावळे, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, राजा दयानिधी, गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, गीता पिलाई , नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजयसिंह येनपुरे, उपायुक्त रश्मी नांदेडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर सर्व मान्यवरांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतीपथावर असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ही पाहणी करताना त्यांनी विशेषतः विमान प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. येथील कामांची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना प्रकल्पाच्या सद्य: स्थितीविषयी माहिती दिली की, 10 जून 2022 रोजी सिडकोतर्फे 1हजार 160 हेक्टरच्या संपूर्ण जागेवर 100 % प्रवेश आणि मार्गाधिकारासाठी अनुज्ञप्ती एनएमआयएएलला प्रदान करण्यात आली आहे. सर्व पुनर्वसन पूर्ण झाले आहेत आणि सिडकोने भूसंपादन आणि पुनर्वसन यासाठी अंदाजे 2000 कोटी खर्च केले आहेत. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) या कंपनीने 29 मार्च 2022 रोजी प्रकल्पासाठी वित्तीय ताळेबंदी (Financial Closure) साध्य केली, ज्यामध्ये SBI ने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टप्पा 1 आणि टप्पा 2 साठी 19 हजार 647 कोटी रु. एकूण प्रकल्प खर्चापैकी 12 हजार 770 कोटी रु. मंजूर केले आहेत (NMIAL द्वारे रु. 15 हजार 981 कोटी आणि सिडकोद्वारे रु. 3 हजार 665 कोटी)
सिडकोतर्फे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये 5.5 मीटरपर्यंत भूविकास, उलवे नदीचा प्रवाह वळविणे आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थानांतरण, ही विकासपूर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. 11 ऑक्टोबर 2024 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमान C-295 द्वारे उद्घाटन लँडिंग करण्यात आले आणि त्यानंतर SU 30 ने दोन लो पास केलेत. तसेच इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस A320 ने 29 डिसेंबर 2024 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले व्यावसायिक लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण केले. 30 जून 2025 पर्यंत या प्रकल्पाने एकूण 96.5% भौतिक प्रगती साधलेली आहे. सध्या जवळपास 13 हजार कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत तर उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. आणि कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबर पूर्वी हे काम पूर्ण करावे, अशा सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 1आणि 2 टप्प्यामध्ये 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.8 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहे, हे विमानतळ सप्टेंबर 2025 मध्ये कार्यान्वित होण्यासाठी सज्ज होत आहे. या विमानतळाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि त्याचे उद्घाटनही आता त्यांच्याच हस्ते होणार आहे, याचा विशेष आनंद असल्याचेही ते शेवटी म्हणाले.