*सामाजिक जिव्हाळा फाउंडेशनतर्फे जि.प.शाळा कोंडगाव,नागोठणे येथे शैक्षणिक साहित्य वाटप*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सामाजिक जिव्हाळा फाउंडेशनतर्फे जि.प.शाळा कोंडगाव,नागोठणे येथे शैक्षणिक साहित्य वाटप*
*सामाजिक जिव्हाळा फाउंडेशनतर्फे जि.प.शाळा कोंडगाव,नागोठणे येथे शैक्षणिक साहित्य वाटप*
रायगड(प्रतिनिधी):-जि.परिषद शाळा कोंडगाव नागोठणे, तालुका-रोहा, येथे सामाजिक जिव्हाळा फाउंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. सध्याच्या धावत्या युगात शासनाने कितीही नव्या नव्या शैक्षणिक धोरणांचा अवलंब केला असला तरी जीवनातील यश गाठायला परिस्थिती नावाचा शत्रू आड येतो. शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता पातळी सुधारेल पण परिस्थितीच काय?परिस्थिती नेहमीच आपल्याला हतबल करते. म्हणूनच आपण ज्या परिस्थितीतून शिकलो त्या स्थितीची जाणीव म्हणून शिक्षणासाठी धडपडणाऱ्या आपल्याच जवळच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचं काम ही संस्था मागील काही वर्षापासून करत आहे. शाळेतील वर्गवार विद्यार्थ्यांना या संस्थेने वेगवेगळे उपयोगी साहित्य वाटप केले. तसेच शाळेतील मुख्याध्यापिका सौ. सुषमा भटकर यांना संस्थेच्यावतीने फ्रेम, पुस्तक आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व पालक वर्गाचा यथोचित सन्मान करण्यात आला.
बालवाडी ते इयत्ता चौथी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे संपूर्ण आर. आर. मोबाईल स्टोअर(दिवा) यांच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्य वस्तूभेट स्वरुपात दिली. साहित्य वाटपानंतर होणारा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद कौतुकास्पद होता. अध्यक्षीय मनोगत संस्थेचे अध्यक्ष शैलेश गायकर यांनी मुलांबरोबरच शिक्षक पालकवर्गाला सुद्धा मार्गदर्शन केले. नुसतेच मुलांना शाळेत पाठवून जबाबदारी संपत नाही तर त्यांचा पाठपुरावा सुद्धा करावा. शैक्षणिक व्यवस्थेतील सद्यस्थितीचे वास्तव सर्वांसमोर मांडले. संस्थेचे सचिव संभाजी धुमक यांनी संस्थेचे प्रास्ताविक आणि प्राथमिक शिक्षण हेच आपल्या जीवनाचा पाया असतो तोच भक्कम करण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांची असते, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांची भूमिका अशा सविस्तर विषयावरती मार्गदर्शन केले. शाळेतील प्राथमिक शिक्षक सुद्धा पट वाढविण्यासाठी योग्य ते प्रयत्न करत आहेत ही बाब खरंच कौतुकास्पद वाटली. शाळेतील इतर कर्मचारी, उपस्थित पालकवर्ग तसेच शाळा व्यवस्थापन कमिटी यांनी सुद्धा आपली मनोगते मांडली. खास करून बालवाडीतील शिक्षिकांनी यांनी सुद्धा या संस्थेबद्दल भरभरून कौतुक केले, याही पुढे या शाळेला मदत कार्य करण्याची ग्वाही सचिवांनी दिली. अशा या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा भटकर,माजी सरपंच कमळ अरविंद बुरुमकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपिका बुरुमकर, अंगणवाडी सेविका सुनीता साजेकर धामणे तसेच पालकवर्ग मोहन बुरुमकर, सुहास मालुसरे, मंगेश बुरुमकर, संस्थेचे अध्यक्ष शैलेश गायकर, सचिव संभाजी धुमक, सहसचिव प्राजक्ता पवार, उपाध्यक्ष शैलेश धुमक, संचालक सचिन मटकर, संचालक परेश धुमक, संचालिका स्वरांजली धुमक, ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मटकर यांनी केलं आणि शेवटी आभार प्रदर्शन परेश धुमक यांनी व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता झाली.