*अर्जुना नदीच्या तीरावर जांगलदेवाचे प्राचीन देवस्थान: आंगलेच्या राऊत वरची वाडीने जपला श्रद्धा आणि संस्कृतीचा वारसा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अर्जुना नदीच्या तीरावर जांगलदेवाचे प्राचीन देवस्थान: आंगलेच्या राऊत वरची वाडीने जपला श्रद्धा आणि संस्कृतीचा वारसा*
*अर्जुना नदीच्या तीरावर जांगलदेवाचे प्राचीन देवस्थान: आंगलेच्या राऊत वरची वाडीने जपला श्रद्धा आणि संस्कृतीचा वारसा*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील आंगले गावातील राऊत वरची वाडी येथे अर्जुना नदीच्या काठी प्राचीन जांगलदेव देवस्थान वसलेले आहे. गुराख्यांचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांगलदेवाची पूजा कोकणातील अनेक गावांमध्ये आजही पारंपरिक पद्धतीने केली जाते. गुराढोरांचे रोगराईपासून संरक्षण व्हावे आणि संपूर्ण वाडीचे सुख- समृद्धीने रक्षण व्हावे, या श्रद्धेतून या देवतेची आराधना केली जाते. या देवस्थानात वर्षातून एकदाच पारंपरिक ‘संभ्रतान’ पूजा केली जाते. यावेळी वाडीतील ग्रामस्थ एकत्र येऊन पूजा, आरती, नारळ अर्पण आणि महाप्रसादाचे आयोजन करतात. तसेच देवाला गाऱ्हाणे घालून वाडीच्या संरक्षणासाठी प्रार्थना केली जाते.
जांगलदेवाची देवस्थाने प्रामुख्याने नदी, ओढे आणि जलस्रोतांच्या जवळ, तसेच घनदाट वनराईत आढळतात. अशा पवित्र वनपरिसराला स्थानिक भाषेत ‘राय’ असे संबोधले जाते. ही देवस्थाने कोकणातील निसर्गपूजा, लोकश्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचे प्रतीक आहेत.
आधुनिक काळातही आंगलेच्या राऊत वरची वाडीतील ग्रामस्थांनी पूर्वजांची ही परंपरा जपली आहे. या प्राचीन देवस्थानांची माहिती आणि त्यामागील श्रद्धा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने आंगले येथील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी या देवस्थानाची माहिती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. अर्जुना नदीच्या सान्निध्यात वसलेले हे जांगलदेव देवस्थान म्हणजे केवळ श्रद्धास्थान नसून कोकणच्या प्राचीन लोकपरंपरा, निसर्गाशी असलेले नाते आणि सांस्कृतिक वारशाची जिवंत साक्ष आहे.



