*शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे-जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे-जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे*
*शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे-जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नैसर्गिक आपत्ती आणि बदलत्या हवामानामुळे पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2026-27 मध्ये राबविण्यात येत आहे. यंदाच्या रब्बी हंगाम पीक विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. रब्बी हंगाम सन 2026 -27 मध्ये, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, उन्हाळी भुईमुग या पिकांसाठी रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी,रब्बी ज्वारी 30 नोव्हेंबर 2026, हरभरा 15 डिसेंबर 2026,गहू बागायत 15 डिसेंबर 2026, उन्हाळी भुईमुग 31 मार्च 2027 अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पीक विमा पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करता येईल. तसेच बँक किंवा सामूहिक सुविधा केंद्र (सीएससी) यांच्या माध्यमातूनही सहभाग नोंदविता येईल. गहू (बागायत) पिकासाठी प्रति हेक्टर 45 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांचा विमा हप्ता 112 रुपये 50 पैसे आहे. रब्बी ज्वारी (जिरायत) व हरभरा या पिकांसाठी प्रत्येकी 36 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असून प्रति हेक्टर 90 रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. उन्हाळी भुईमूग पिकासाठी प्रति हेक्टर 40 हजार 600 रुपये विमा संरक्षित रक्कम असून शेतकऱ्यांना 101 रुपये 50 पैसे विमा हप्ता भरावा लागणार आहे.
पीकनिहाय विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर 2026,गहू (बागायत) व हरभऱ्यासाठी 15 डिसेंबर 2026, तर उन्हाळी भुईमुगासाठी 31 मार्च 2027 अशी निश्चित करण्यात आली आहे. वरील विमा संरक्षित रक्कम व शेतकरी विमा हप्ता प्रति हेक्टरनुसार आहे.
रब्बी ज्वारी पिकासाठी नवापूर तालुक्यात नवापूर, नवागाव, खांडबारा, विसरवाडी व चिंचपाडा या पाच महसूल मंडळांचा समावेश आहे. शहादा तालुक्यात शहादा, प्रकाशा, कलसाडी, म्हसावद, ब्राह्मणपुरी, वडाळी, असलोद, सारंगखेडा, मोहिदा तश व मंदाणा या दहा महसूल मंडळांचा समावेश आहे. तळोदा तालुक्यात तळोदा, बोरद, प्रतापपूर व सोमावल या चार, तर अक्कलकुवा तालुक्यात अक्कलकुवा, खापर व मोरांबा या तीन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. हरभरा पिकासाठी नंदुरबार तालुक्यात नंदुरबार, धानोरा, खोंडामळी, आष्टे, कोरीट, मांडळ व रनाळे या सात महसूल मंडळांचा समावेश आहे. शहादा तालुक्यात शहादा, प्रकाशा, कलसाडी, म्हसावद, ब्राह्मणपुरी, वडाळी, असलोद, सारंगखेडा, मोहिदा तश व मंदाणा या दहा महसूल मंडळांचा समावेश आहे., अक्राणी तालुक्यात रोषमाळ, चुलवड, खुंटामोडी व तोरणमाळ या चार, तर अक्कलकुवा तालुक्यात अक्कलकुवा, खापर, मोरांबा, मोलगी, डाब व वडफळी या सहा महसूल मंडळांचा समावेश आहे.
गहू (बागायत) पिकासाठी नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार, धानोरा, खोंडामळी, आष्टे, कोरीट, मांडळ व रनाळे या सात महसूल मंडळांचा समावेश आहे नवापूर तालुक्यातील नवापूर, नवागाव, खांडबारा, विसरवाडी व चिंचपाडा या पाच महसूल मंडळांचा समावेश आहे. शहादा तालुक्यातील शहादा, प्रकाशा, कलसाडी, म्हसावद, ब्राह्मणपुरी, वडाळी, असलोद, सारंगखेडा, मोहिदा तश व मंदाणा या दहा महसूल मंडळांचा समावेश आहे आणि तळोदा तालुक्यातील तळोदा, बोरद, प्रतापपूर व सोमावल या चार महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत. उन्हाळी भुईमूग पिकासाठी नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील व महसूल मंडळातील पीक अधिसूचित आहे किंवा नाही, याची खात्री करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे.
योजनेत सहभागी होण्यासाठी सातबारा उतारा, आधार कार्ड, आधार संलग्न बँक खाते, पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे. तसेच ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी (Agristack Farmer ID) आणि डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत पिकाची नोंद करणे बंधनकारक आहे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पिकाखालील क्षेत्र किमान 10 गुंठे असणे आवश्यक आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हेतील पीक नोंद आणि विमा अर्जातील पिकात तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्व्हेतील नोंद अंतिम मानली जाईल व विमा अर्ज रद्द होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने अर्ज करून योजनेचा गैरफायदा घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे कृषीविषयक योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगाम 2026-27 साठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे शेतकरी, तसेच कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत सहभाग नोंदवावा. योजनेत सहभागी होण्यास इच्छुक नसल्यास बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे.
योजनेच्या सहभागाबाबत अडचण आल्यास संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा. तसेच 14447 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेता येईल. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.



