*‘एकवेळ समझोता’ योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 3 हजार 425 शेतकरी पात्र,शेतकऱ्यांनी 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत आपल्या हिश्श्याची दोन लाखावरील रक्कम भरण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘एकवेळ समझोता’ योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 3 हजार 425 शेतकरी पात्र,शेतकऱ्यांनी 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत आपल्या हिश्श्याची दोन लाखावरील रक्कम भरण्याचे आवाहन*
*‘एकवेळ समझोता’ योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील 3 हजार 425 शेतकरी पात्र,शेतकऱ्यांनी 31 मार्च 2027 पर्यंत बँकेत आपल्या हिश्श्याची दोन लाखावरील रक्कम भरण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील 3 हजार 425 शेतकरी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील 537 गावांमधील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 19 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्या संबंधित बँक शाखा, विकास सेवा सोसायटी आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील तपशील तपासून आपल्या हिश्श्याची दोन लाख रुपयांवरील रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत संबंधित बँकेत जमा करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस. वाय. पुरी यांनी केले आहे.
या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहन असे तीन घटक आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफी घटकाची अंमलबजावणी सुरू असून जिल्ह्यातील 28 हजार 426 थकीत कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी 21 हजार 136 पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठीचार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.28 हजार 426 थकीत कर्जदार शेतकऱ्यापैकी आजअखेर थकबाकी व ओटीएस अंतर्गत एकूण 24 हजार 561 शेतकरी कर्जमुक्तीस पात्र ठरले असून 15 हजार 937 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. अद्याप आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या 5 हजार 199 शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया विनामूल्य पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस. वाय. पुरी यांनी केले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील ओटीएस घटकांतर्गत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 522 आणि राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांचे 2 हजार 903 अशा एकूण 3 हजार 425 शेतकऱ्यांचा समावेश आहे. एकवेळ समझोता (ओटीएस) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी यादीत नमूद केल्यानुसार आपल्या हिश्श्याची दोन लाख रुपयांवरील रक्कम संबंधित बँकेत भरल्यानंतर बँकेमार्फत माहिती पोर्टलवर अद्ययावत केली जाईल. त्यानंतर तीन दिवसांनी महाआयटीमार्फत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सर्व बँकांना ओटीएस अंतर्गत निश्चित केलेल्या थकबाकीच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांकडून कोणत्याही परिस्थितीत वसूल करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. एकवेळ समझोता अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायत तसेच बँकेच्या शाखेत व विकास संस्थेच्या शाखेत विहीत नमून्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम कोणत्याही एका कर्जखात्यात भरण्याची सुविधा आहे. मात्र, संबंधित खात्यासाठी यादीत नमूद केलेल्या ओटीएस रकमेपेक्षा अधिक रक्कम भरू नये. रक्कम भरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बँकेकडून योग्य माहिती घ्यावी. शेतकऱ्यांची हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर संबंधित बँकेने याबाबतची माहिती पोर्टलवर अद्ययावत करावी.
बँकांकडून दर शुक्रवारी भरलेल्या रकमेची माहिती पोर्टलवर अद्ययावत केली जाणार आहे.याची माहिती बँकेने शेतकऱ्यांना कळवायची आहे. माहिती अद्ययावत झाल्यानंतर आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या निकषांनुसार शासनामार्फत दोन लाख रुपयांचा लाभ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात येईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याची कर्जमुक्ती होईल.
यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठीच आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. ओटीएस योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची ही पहिलीच यादी नसून बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण करून पुढील काळातही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच, मयत, वयोवृद्ध आणि बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचणी येणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस. वाय. पुरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.



