*सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत यांना ‘तोरणडोंगरी एक्सप्रेस’ म्हणून नवी ओळख द्या,मंत्री नरहरी झिरवाळ यांचे प्रतिपादन,तोरणडोंगरी येथे दिलीप गावीत यांचा भव्य नागरी सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत यांना ‘तोरणडोंगरी एक्सप्रेस’ म्हणून नवी ओळख द्या,मंत्री नरहरी झिरवाळ यांचे प्रतिपादन,तोरणडोंगरी येथे दिलीप गावीत यांचा भव्य नागरी सत्कार*
*सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत यांना ‘तोरणडोंगरी एक्सप्रेस’ म्हणून नवी ओळख द्या,मंत्री नरहरी झिरवाळ यांचे प्रतिपादन,तोरणडोंगरी येथे दिलीप गावीत यांचा भव्य नागरी सत्कार*
सुरगाणा(प्रतिनिधी):-आशियाई पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून देशाचा नावलौकिक उंचावणारे आदिवासी खेळाडू दिलीप गावीत यांचा तोरणडोंगरी येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलीप गावीत यांचा गौरव करताना, ‘‘ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांना ‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून ओळखले जाते, त्याचप्रमाणे दिलीप गावीत यांची ओळख आता ‘तोरणडोंगरी एक्सप्रेस’ म्हणून निर्माण झाली पाहिजे,’’ असे प्रतिपादन केले. तोरणडोंगरी गाव विकास समिती, कोकणी-कोकणा आदिवासी समाज सेवा संघ आणि आदिवासी बचाव अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमापूर्वी गावातून सुवर्णपदक विजेते दिलीप गावीत आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील आबालवृद्धांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी क्रांतिवीरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाले, तर ते आपल्या कर्तृत्वाने आयुष्याचे सोने करू शकतात. यापूर्वीही आदिवासी समाजातील अनेक बांधवांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुणवंत खेळाडूंना शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी दिलीप गावीत यांच्या आई- वडिलांचा विशेष गौरव करण्यात आला. मंत्री नरहरी झिरवाळ आणि आमदार नितीन पवार यांनी प्रत्येकी 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमात खासदार भास्कर भगरे, आमदार नितीन पवार, आमदार मंजुळा गावीत, डॉ. तुळशीराम गावीत, रावण चौरे आणि किसन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना दिलीप गावीत यांनी आपल्या यशामागे आई-वडील, गावातील ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक आणि विशेषतः प्रशिक्षक वैजनाथ काळे सर यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगताना ते म्हणाले, ‘‘माझ्याकडे आर्थिक अडचण असताना वैजनाथ सरांनी स्वतःची जमीन विकून मला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत केली. माझा सराव करून घेतला आणि मला स्पर्धेत उतरवले. त्यांच्या या त्यागामुळेच आज मी देशासाठी सुवर्णपदक मिळवू शकलो.’’ त्यांच्या या भावनिक मनोगताने उपस्थितांची मने जिंकली. प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून, त्यांना योग्य संधी, सुविधा आणि प्रशिक्षण मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात, असे सांगितले. ते म्हणाले, ‘‘इतर देशांमध्ये एका खेळाडूमागे दहा जणांची प्रशिक्षक व सहाय्यकांची टीम कार्यरत असते; मात्र दिलीपच्या पाठीशी मी एकटाच होतो. खेळाडूंच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेतील ही अनास्था बदलण्याची गरज आहे.’’ त्यांनी खेळाडूंना अधिक सक्षम सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ माजी आमदार जे. पी. गावीत होते. त्यांनी दिलीप गावीत यांचे अभिनंदन करताना सांगितले की, दिलीपने आपल्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करून देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या यशात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसह संस्थेच्या शाळेचाही मोठा वाटा आहे. प्रशिक्षक वैजनाथ काळे आणि दिलीप गावीत यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक करून आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमप्रसंगी मंचवर एन. डी. गावीत, इंद्रजित गावीत, मोहन गांगुर्डे, अॅड. दत्तू पाडवी, गिरीश गावीत, मोहन गांगुर्डे, विनायक गावीत, के. के. गांगुर्डे, सुभाष चौधरी, रतन चौधरी, काशिनाथ बागुल, विजय पवार, रमेश साबळे, नामदेव ठाकरे, मंगलदास गवळी, उलगुलान शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयराम गावीत यांनी केले, तर सूत्रसंचालन परशराम पाडवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराम गावीत व परिवार, ग्रामस्थ आणि जयवंत गारे यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. प्रमुख अतिथींचा सन्मान गावकरी आणि जयवंत गारे यांच्या टीमच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांनी एकत्रित स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. दिलीप गावीत यांच्या सुवर्णयशाने तोरणडोंगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, ‘तोरणडोंगरी एक्सप्रेस’ ही ओळख आदिवासी युवकांसाठी नव्या प्रेरणेचा आणि क्रीडा क्षेत्रातील स्वप्नांना बळ देणारा गौरव ठरली आहे.



