*महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त, उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, नोव्हेंबर 2026 ते एप्रिल 2027 या कालावधीत विद्यापीठे, महाविद्यालयांमध्य
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त, उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, नोव्हेंबर 2026 ते एप्रिल 2027 या कालावधीत विद्यापीठे, महाविद्यालयांमध्य
*महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त, उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, नोव्हेंबर 2026 ते एप्रिल 2027 या कालावधीत विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये उपक्रम राबविणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त सन 2027 हे द्विशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व संशोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महात्मा फुले यांनी भारतीय समाजात सामाजिक समता, स्त्री शिक्षण, शेतकरी कल्याण आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत केलेले कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, तसेच त्यांच्यामध्ये मूल्याधिष्ठित, समावेशक व कौशल्याधारित शिक्षणाची जोपासना करणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. या द्विशताब्दी वर्षानिमित्त उच्च शिक्षण संचालनालय, तंत्र शिक्षण संचालनालय, कला संचालनालय आणि ग्रंथालय संचालनालय यांच्या अधिपत्या खालील विद्यापीठे, महाविद्यालये व संस्थांसाठी स्वतंत्र कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत नोव्हेंबर 2026 मध्ये स्त्री सक्षमीकरण विषयावर काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भूमिका अभिनय, नाटिका, पोस्टर स्पर्धा व पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये संविधानावर आधारित पुस्तकांचे वाचन, महात्मा फुले साहित्यवाचन अभियान, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजन, पोवाडा स्पर्धा, जनजागृती रॅली आयोजित करण्यात येणार आहे. जानेवारी 2027 मध्ये सांस्कृतिक विकास अंतर्गत महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक महोत्सव, देशभक्तीपर कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, लोककला सादरीकरण तर फेब्रुवारीमध्ये संशोधन व प्रकल्पात प्रकल्प कार्य, स्थानिक इतिहास अभ्यास, मुलाखत उपक्रम मार्चमध्ये निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा, प्रकल्प सादरीकरण, पोस्टर निमिती उपक्रम स्पर्धा आणि एप्रिलमध्ये समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत नोव्हेबर मध्ये स्त्री सक्षमीकरणा साठी उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला अभियंते, संशोधक व उद्योजिका यांच्या मुलाखती, व्याख्याने, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भूमिका अभिनय, नाटिका व पोस्टर स्पर्धा आयोजित करणे. प्रेरणा सप्ताह व पुस्तक प्रदर्शन आयोजित करणे. डिसेंबर महिन्यात महात्मा फुले साहित्य व संविधान विषयक पुस्तकांचे वाचन अभियान, परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, डिजिटल साक्षरता अभियान, पोवाडा स्पर्धा व सामाजिक जनजागृती रॅली आयोजित करणे. जानेवारी, 2027 मध्ये महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना, स्त्रीशिक्षण, सामातिक सुधारणा व सामाजिक न्यायासाठी दिलेल्या योगदानावर आधारित लघुपट निर्मिती स्पर्धा आयोजित करणे. महात्मा फुले यांचे जीवनचरित्र,शैक्षणिक विचार, सामाजिक कार्य व आधुनिक समाजातील त्यांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर शोध निबंध सादरीकरणे स्पर्धा. फेब्रुवारी महिन्यात ग्रामीण व सामाजिक समस्यांवरील प्रकल्पकार्य, स्थानिक इतिहास अभ्यास, प्रकल्पकार्य, स्थानिक इतिहास अभ्यास, तांत्रिक मॉडेल निर्मिती, हॅकार्थान, संशेाधन सादरीकरण, नवोपक्रम प्रदर्शन व सामाजिक उपयुक्त तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्पर्धा आयेाजित करणे. मार्च महिन्यात वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, प्रकल्प सादरीकरणे, पोस्टर निर्मिती, स्टार्टटप संकल्पना स्पर्धा, कौशल्या धारित कार्यशाळा व उद्योजकता मार्गदर्शन कार्यक्रम. एप्रिल महिन्यात महात्मा जोतीराव फुले जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयेाजितकरणे व समारोप. कला संचालनालयामार्फत नोव्हेंबर, 2026 ते एप्रिल, 2027 दरम्यान महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित रेखाचित्रण, पोस्टर डिझाइन, सुलेखन, चित्रकला व शिल्पकला स्पर्धा घेण्यात येतील. तसेच स्थानिक सत्यशोधक चळवळीच्या ऐतिहासिक केंद्रांना भेटी देऊन ऐतिहासिक वास्तूंचे रेखाटन आणि सामाजिक वास्तववादावर आधारित कलात्मक उपक्रम तसेच द्विजन्मशताब्दी वर्षाच्या वर्षभरातील सर्वोत्कृष्ट कलाकृतीचे महाविद्यालय स्तरावर प्रदर्शन व समारोप कार्यक्रम राबविण्यात येतील. ग्रंथालय संचालनालया मार्फत नोव्हेंबर, 2026 ते एप्रिल, 2027 दरम्यान महात्मा फुले यांच्या कार्यावर व्याख्याने, एकपात्री प्रयोग, जनजागृतीसाठी रील्स निर्मिती, त्यांच्या साहित्याचे सार्वजनिक वाचन, ग्रंथप्रदर्शने, परिसंवाद, चर्चासत्रे व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या सर्व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित संचालनालयांच्या संचालकांनी राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये व संस्थांना आवश्यक सूचना व परिपत्रके निर्गमित करावीत, तसेच उपक्रमांचे नियोजन व सनियंत्रण करावे. राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक समता, स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय आणि मानवमुक्तीच्या विचारांचा प्रसार विद्यार्थ्यांमध्ये व्हावा, तसेच त्यांच्यात नेतृत्व, संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची मूल्ये विकसित व्हावीत, या दृष्टीने हे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.



