*महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त,‘मराठी भाषा दूत’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद,मराठी भाषा विभागाचा अभिनव उपक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त,‘मराठी भाषा दूत’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद,मराठी भाषा विभागाचा अभिनव उपक्रम*
*महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त,‘मराठी भाषा दूत’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद,मराठी भाषा विभागाचा अभिनव उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी भाषा दूत’ या राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेला महाराष्ट्राच्या विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेचा प्रचार- प्रसार, तरुणांमध्ये भाषेविषयी अभिमान निर्माण करणे आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची नव्या पिढीला ओळख करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. 16 ते 21 वर्षे वयोगटातील जगभरातील मराठी भाषक तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना आपले विचार प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. मराठी भाषा, साहित्य, सामाजिक समता, स्त्री शिक्षण आणि सत्यशोधक विचारांचा वारसा तरुणांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण ठरला. महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता, स्त्री सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात केलेले कार्य आजही समाजाला दिशादर्शक आहे. त्यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मराठी भाषा विभागाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्याशी संबंधित पाच विषय देण्यात आले होते. यामध्ये ‘महात्मा फुले यांचे मराठी साहित्यातील योगदान’, ‘महात्मा फुले : आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार’, ‘महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षण व स्त्री सक्षमीकरणातील योगदान’, ‘महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्फूर्तिस्थान’ आणि ‘महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार’ या विषयांचा समावेश होता. या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या विचारांचा अभ्यास करून ते आपल्या भाषणातून मांडण्याची संधी मिळाली. 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2026 या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट मिडिया व ट्रेनिंग, बेलापूर नवी मुंबई या संस्थेमार्फत करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धकाला आपले विचार मांडण्यासाठी तीन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात नोंदणी करणाऱ्या एक हजार स्पर्धकांना प्राधान्याने प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून सर्वोत्तम 100 वक्त्यांची निवड ‘मराठी भाषा दूत’ म्हणून करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे त्यांना विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. तसेच, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ‘मराठी भाषा दूत’ हा सन्मान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठीही उपयुक्त ठरणार आहे. स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात आली. स्पर्धेत एक हजार स्पर्धक सहभागी झाले. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये, विद्यापीठे तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी ई-मेल आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला.
मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरातील तब्बल 34 महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्पर्धेची माहिती देण्यात आली, त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आणि मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या नियोजनबद्ध संपर्क मोहिमेमुळे स्पर्धेची माहिती विविध शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तरुणांना सक्रियपणे सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने या उपक्रमाने महत्वाची भूमिका बजावली. स्पर्धेच्या आयोजनासाठी मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील ग्रंथाली प्रतिभांगण ही वास्तू निवडण्यात आली होती. येथे दोन स्वतंत्र दालनांमध्ये एकाच वेळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दोन्ही दालनांमध्ये टीव्ही मॉनिटर्सच्या माध्यमातून परीक्षकांना स्पर्धकांचे सादरीकरण पाहून परीक्षण करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धेच्या परीक्षणासाठी ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि अभ्यासक संजीवनी खेर, ज्येष्ठ नाट्यकर्मी व संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकार प्रमोद पवार, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सुनील रामटेके आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखा अभ्यासक व चित्रपट प्रमाणन मंडळाचे सल्लागार योगेश कुलकर्णी यांचा सहभाग होता. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा विस्तार केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या विविध विभागांपर्यंत पोहोचला. पुण्यातील एस. पी. महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यालय, कोल्हापूरमधील विविध महाविद्यालये, डोंबिवलीतील मॉडेल कॉलेज आणि नवी मुंबईतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
नाशिक, अमळनेर, जळगाव, परभणी कृषी विद्यापीठ, वर्धा, नागपूर आणि अमरावती येथील महाविद्यालयांतूनही मोठ्या प्रमाणावर प्रवेशिका प्राप्त झाल्या. कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, अमरावती, मुंबई तसेच बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषक तरुणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या व्यापक सहभागातून मराठी भाषेविषयी तरुणांमध्ये असलेली आस्था आणि महात्मा फुले यांच्या विचारांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधोरेखित झाली.
भाषेचे संवर्धन केवळ साहित्यनिर्मिती किंवा भाषिक उपक्रमांपुरते मर्यादित नसून, नव्या पिढीने त्या भाषेतून विचार मांडणे, संवाद साधणे आणि समाजपरिवर्तनाच्या विचारांचा स्वीकार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘मराठी भाषा दूत’ वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मराठी भाषा आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा संगम घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरुणांना मराठी भाषेतून प्रभावीपणे व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच सामाजिक समता, शिक्षण आणि परिवर्तनाच्या मूल्यांची जाणीव करून देणारा हा उपक्रम मराठी भाषेच्या भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे-गजानन पाटील, विभागीय संपर्क अधिकारी.



