*नोकरीच्या मागे न धावता कशेळीतील तरुणाने फुलवला आंब्याचा व्यवसाय ‘कोकण फॅक्टरी’ ब्रँडची भरारी, पारंपरिक आंबा व्यवसायाला आधुनिक मार्केटिंगची जोड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नोकरीच्या मागे न धावता कशेळीतील तरुणाने फुलवला आंब्याचा व्यवसाय ‘कोकण फॅक्टरी’ ब्रँडची भरारी, पारंपरिक आंबा व्यवसायाला आधुनिक मार्केटिंगची जोड*
*नोकरीच्या मागे न धावता कशेळीतील तरुणाने फुलवला आंब्याचा व्यवसाय ‘कोकण फॅक्टरी’ ब्रँडची भरारी, पारंपरिक आंबा व्यवसायाला आधुनिक मार्केटिंगची जोड*
राजापूर(प्रतिनिधी):-कोकण म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो तो हापूस आंबा आणि त्याचा सुगंध. मात्र, या आंब्याला योग्य बाजारपेठ मिळवून देत स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचे स्वप्न काही तरुण पाहत आहेत. राजापूर तालुक्यातील कशेळी गावचे अजिंक्य सुभाष हर्डीकर यांनी याच विचारातून आंबा व्यवसायात वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. उच्च शिक्षणानंतर नोकरीच्या मागे धावण्याऐवजी त्यांनी पारंपरिक आंबा व्यवसायाला आधुनिक मार्केटिंगची जोड देत ‘कोकण फॅक्टरी’ या नावाने आपला ब्रँड उभा केला आहे. शिक्षणानंतर व्यवसायाची निवड आजच्या काळात उच्चशिक्षण घेतल्यानंतर अनेक तरुण नोकरीला प्राधान्य देतात. मात्र, अजिंक्य यांनी स्वतःच्या गावात राहून काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. घरातील आंबा लागवडीचा अनुभव आणि कोकणातील फळांना असलेली मोठी बाजारपेठ लक्षात घेऊन त्यांनी आंबा व्यवसायाकडे अधिक नियोजनबद्ध पद्धतीने पाहण्यास सुरुवात केली.
पारंपरिक पद्धतीने आंब्याची विक्री करण्यापलीकडे जाऊन ग्राहकांपर्यंत थेट पोहोचणे, उत्पादनाचे योग्य सादरीकरण करणे आणि विश्वासार्हतेच्या बळावर ग्राहकवर्ग तयार करणे, हा त्यांच्या व्यवसायाचा मुख्य दृष्टिकोन आहे.
पारंपरिक शेतीला आधुनिक मार्केटिंगची जोड आंबा व्यवसायात केवळ चांगले उत्पादन घेणे पुरेसे नसते. त्यासाठी योग्य पॅकिंग, दर्जानुसार वर्गीकरण, ग्राहकांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि वेळेवर वितरण यांनाही तितकेच महत्त्व असते. अजिंक्य यांनी या बाबींवर लक्ष केंद्रित करत डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास सुरुवात केली. सोशल मीडिया, ग्राहकांशी थेट संवाद आणि ऑनलाइन माध्यमांतून उत्पादनाची माहिती देणे अशा पद्धतींचा वापर करून त्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायाला व्यापक बाजारपेठ मिळवून देण्याची संधी निर्माण झाली आहे.बीतरुणांसाठी रोजगाराची नवी दिशा ग्रामीण भागातील तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता आपल्या परिसरातील उपलब्ध साधनसंपत्ती, शेती आणि स्थानिक उत्पादनांचा विचार करून उद्योग उभारण्याची गरज आहे. आंबा, काजू, कोकम यांसारख्या कोकणातील उत्पादनांमध्ये मूल्यवर्धन आणि विपणनाच्या माध्यमातून व्यवसायवाढीची मोठी संधी आहे.
अजिंक्य यांचा प्रवास ग्रामीण भागात राहूनही आधुनिक विचारसरणी, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक नियोजनाच्या मदतीने स्वतःची ओळख निर्माण करता येते, हे दाखवून देणारा आहे. कोकणच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळण्याची आशा कोकणातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा, स्थानिक उत्पादनांना स्वतंत्र ओळख मिळावी आणि तरुणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. ‘कोकण फॅक्टरी’ सारख्या ब्रँडच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांमुळे भविष्यात कोकणातील कृषी व्यवसायाला नवी दिशा मिळू शकते.
ग्रामीण भागातील संधी ओळखून त्यातून व्यवसाय उभारण्याचा अजिंक्य हर्डीकर यांचा प्रयत्न इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



