*आईच्या मायेची सावली आता वृक्षरूपात! मातृदिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून शिक्षक मित्रांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आईच्या मायेची सावली आता वृक्षरूपात! मातृदिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून शिक्षक मित्रांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
*आईच्या मायेची सावली आता वृक्षरूपात! मातृदिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून शिक्षक मित्रांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
सुरगाणा(प्रतिनिधी):-आई म्हणजे मायेची सावली, प्रेमाचा आधार आणि आयुष्यभर निस्वार्थपणे साथ देणारी शक्ती. आईच्या या अतूट प्रेमाची आणि त्यागाची जाणीव मनात ठेवत 10 सप्टेंबर मातृदिनानिमित्त ‘एक पेड माँ के नाम’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करीत शिक्षक रतन चौधरी यांनी आई साकरुबाई, शिक्षक मित्र दीपक गवळी यांनी आई बनाबाई, पंडित गावित यांनी आई मंजुळाबाई तर स्वदेश फाऊंडेशन मित्र तुकाराम सुतारे यांनी आई नंदाबाई तर तुषार कोळी यांनी आई सुरेखा यांच्या नावाने मातृदिनानिमित्त कांचन व करंज या जातीच्या वृक्षांची लागवड सुरगाणा ते चिल्लारपाडा या रस्त्यालगत असलेल्या टेकडीवर वृक्षारोपण केले. वृक्ष मित्रांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आईच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करत या उपक्रमातून मातृप्रेमासोबतच पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. आई आपल्या लेकराचे ज्या प्रेमाने संगोपन करते, त्याच भावनेने लावलेल्या रोपट्याचे संगोपन करण्याची संकल्पना या उपक्रमामागे आहे. वृक्ष केवळ पर्यावरणाचा घटक नसून तो जीवनाचा आधार आहे. झाडे आपल्याला प्राणवायू, सावली, फळे, फुले आणि जैवविविधतेचे संरक्षण देतात. त्यामुळे आईच्या नावाने लावलेले प्रत्येक झाड हे पुढील पिढीसाठी प्रेमाची आणि जबाबदारीची अमूल्य भेट ठरावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी उपस्थितांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. प्रत्येक रोपट्याला आईचे नाव किंवा तिच्या स्मृतीशी जोडत त्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. ‘झाड लावणे सोपे; मात्र ते जगवणे ही खरी मातृसेवा’, असा संदेश देत वृक्षांच्या नियमित देखभालीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई आणि बदलते हवामान यांसारख्या समस्यांचा सामना समाजाला करावा लागत आहे. अशा परिस्थितीत केवळ वृक्षारोपणाचे कार्यक्रम न करता लावलेल्या रोपट्यांचे सातत्याने संगोपन करणे गरजेचे आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमातून हाच व्यापक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. विशेष म्हणजे, मातृदिनाचा उत्सव केवळ शुभेच्छा, भेटवस्तू किंवा औपचारिक कार्यक्रमांपुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकीची जोड उपक्रमाने देण्यात आली. आईच्या प्रेमाची आठवण कायम ठेवणारे झाड भविष्यात मोठे होऊन अनेकांना सावली देईल, पक्ष्यांना आसरा देईल आणि परिसरातील पर्यावरण समृद्ध करेल. त्यामुळे एका छोट्याशा रोपट्यातून मोठ्या सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होऊ शकते. ‘माझ्या आईच्या नावाने एक झाड, निसर्गाच्या संवर्धनासाठी एक पाऊल आणि भविष्यातील पिढीसाठी हिरवाईची अमूल्य भेट’, या भावनेतून सहभागी झालेल्यांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.
आईने दिलेल्या जीवनाच्या ऋणाची परतफेड पूर्णपणे कधीच होऊ शकत नाही; मात्र तिच्या नावाने एक वृक्ष लावून तो जपणे ही निसर्ग आणि समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर वाट आहे. त्यामुळे ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम मातृप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम ठरला.
या उपक्रमातून ‘प्रत्येक आईच्या नावाने एक झाड आणि प्रत्येक झाडासाठी आयुष्यभराची जबाबदारी’ हा संदेश देण्यात आला. मातृदिनानिमित्त सुरू झालेली ही हिरवी चळवळ वर्षभर सुरू ठेवून अधिकाधिक नागरिकांनी आपल्या आईच्या नावाने वृक्ष लावावेत आणि त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण रतन चौधरी यांनी केले आहे.



