*युवा क्रांतीच्या दणक्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; कामात निष्काळजीपणा करणाऱ्या रतनपाडा ग्रामविकास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*युवा क्रांतीच्या दणक्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; कामात निष्काळजीपणा करणाऱ्या रतनपाडा ग्रामविकास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
*युवा क्रांतीच्या दणक्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; कामात निष्काळजीपणा करणाऱ्या रतनपाडा ग्रामविकास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-तळोदा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत रतनपाडा अंतर्गत येणाऱ्या 'रेटपाडा' येथील पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येवर आणि प्रशासकीय अनास्थेवर युवा क्रांती सामाजिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तळोदा पंचायत समिती प्रशासन तातडीने ॲक्शन मोडमध्ये आले आहे. कर्तव्यात अक्षम्य कसूर करणारे ग्रामविकास अधिकारी विजयसिंग भोमा जाधव यांना तळोदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (BDO) के.एम. पवार यांनी कडक शब्दांत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
ग्रुप ग्रामपंचायत रतनपाडा येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी मागील 15 ते 20 दिवसांपासून कार्यालयात गैरहजर राहत असल्यामुळे ग्रामस्थांचे वैयक्तिक लाभाचे शासकीय कामे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले व इतर महत्त्वाचे दाखले अडकून पडले होते. अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी (मोबाईल) देखील सतत बंद राहत असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. गावातील पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईकडेही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवा क्रांती सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. रुपसिंग वसावे यांच्या सूचनेनुसार संघटनेच्या शिष्टमंडळाने व रेटपाडा येथील ग्रामस्थांनी तळोदा पंचायत समिती गाठून गट विकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. निवेदनाद्वारे गावात तातडीने 2 नवीन बोअरवेल व 5000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या मंजूर कराव्या, तसेच बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली. येत्या 8 दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास पंचायत समितीसमोर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.
सदर निवेदन देताना युवा क्रांतीचे तळोदा तालुकाध्यक्ष प्रमोद वळवी, तालुका सरचिटणीस सोहम पाडवी, तालुका उपाध्यक्ष चिंतामण नाईक, पंकज प्रधान, अविनाश नाईक, आतिश वळवी, विजय नाईक, सागर वळवी, प्रेम वळवी, हारेश वळवी, महेंद्र वळवी, पंकज वळवी, गणेश वळवी, कार्तिक वळवी, रोहन वळवी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
युवा क्रांतीच्या या आक्रमक पवित्र्याची आणि दिलेल्या इशाऱ्याची गंभीर दखल घेत गट विकास अधिकारी के.एम.पवार यांनी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जारी केली. वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे गैरहजर राहणे, फोन बंद ठेवून संपर्क क्षेत्राबाहेर राहिल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे नुकसान करणे या बाबींवर नोटीशीत तीव्र ताशेरे ओढण्यात आले आहेत. सदर कृत्य हे महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967 च्या नियम 3 चे उल्लंघन करणारे असून, महाराष्ट्र जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 नुसार शिस्तभंग विषयक कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे का पाठवू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्याला नोटीस मिळाल्यापासून 3 दिवसांच्या आत समक्ष उपस्थित राहून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विहित मुदतीत समर्थनीय खुलासा प्राप्त न झाल्यास एकतर्फी शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. युवा क्रांती संघटनेच्या या धडक पाठपुराव्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, परिसरातील ग्रामस्थांमधून युवा क्रांती सामाजिक संघटनेचे कौतुक केले जात आहे.



