*देवाचे गोठणे येथील सोगम वाडीत वसलेला अद्भुत व गूढ सांस्कृतिक वारसा"नागदोबाची कोंड-शरद नवाळे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवाचे गोठणे येथील सोगम वाडीत वसलेला अद्भुत व गूढ सांस्कृतिक वारसा"नागदोबाची कोंड-शरद नवाळे*
*देवाचे गोठणे येथील सोगम वाडीत वसलेला अद्भुत व गूढ सांस्कृतिक वारसा"नागदोबाची कोंड-शरद नवाळे*
राजापूर(प्रतिनिधी):- तालुक्यात वसलेल्या देवाचे गोठणे गावातील सोगमवाडी ही आकाराने लहान असली, तरी तिच्या कुशीत एक अद्भुत आणि गूढ असा सांस्कृतिक वारसा दडलेला आहे. या वाडीतील नागदोबाची कोंड हे स्थान केवळ एक डोह नाही; तर अनेक पिढ्यांच्या श्रद्धा, लोककथा, परंपरा आणि स्मृती यांचे जिवंत प्रतीक आहे.
"नागदोबाची कोंड" हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो निळ्याशार, गडद आणि अथांग पाण्याचा डोह. ज्यांनी हा डोह प्रत्यक्ष पाहिला आहे, त्यांच्या मनात आजही त्याच्याविषयी आदर, कुतूहल आणि एक विलक्षण रोमांच जागृत होतो. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार नागदोबा हे जागृत देवस्थान असून आजही सोगमवाडीतील झिंबरे भावकी या देवस्थानाची परंपरेने पूजा-अर्चा करीत आहेत. मात्र, इतके ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान असूनही त्याकडे शासनाचे अपेक्षित लक्ष गेलेले नाही, ही खंत स्थानिकांना कायम वाटते.
सोगमवाडीच्या वहाळालगत, दाट जंगलाच्या कुशीत हे देवस्थान वसलेले आहे. डोहाच्या काठावर अखंड जांभ्या दगडात सुमारे दहा-बारा फूट उंचीचे देवालय कोरलेले आहे. विशेष म्हणजे देवालय आणि नागदोबाची मूर्ती एकाच शिळेत अविभाज्य स्वरूपात घडविलेली आहे. कोकणातील अशा प्रकारचे हे दुर्मीळ शिल्प मानले जाते. या स्थळाभोवतीचे निसर्गवैभव आणि गूढ शांतता मनाला थक्क करून सोडते. स्थानिकांच्या मते या डोहाची खोली आजपर्यंत कोणीही मोजू शकलेली नाही. कडक उन्हाळ्यात, अगदी मे महिन्यातही या डोहातील पाण्याची पातळी कमी होत नाही. त्यामुळे या डोहाला अंत नाही, अशी समजूत अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. सोगमवाडीच्या वहाळाचा उगम गिरमादेवी येथे होतो. त्या प्रवाहात गावकरी गोड्या पाण्यातील मासेमारी करतात; मात्र नागदोबाच्या कोंडीत आजवर कोणीही मासेमारी केल्याचे ऐकिवात नाही. हे स्थान पवित्र मानले जात असल्याने तेथे जाताना आजही अनेक जण पावित्र्य आणि काही धार्मिक संकेत पाळतात. श्रावण महिन्यात शिवणेखुर्द गावातून फुलांनी सजविलेली परडी, त्यात प्रज्वलित ज्योत ठेवून या डोहात सोडण्याची परंपरा आजही सुरू आहे. स्थानिकांच्या कथनानुसार ती परडी काही काळ पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना दिसते. शिमगा उत्सवाच्या काळात शिवणेखुर्द गावघराण्यातून नागदोबाच्या मानकरी झिंबरे भावकी यांच्या खेळ्यात पंचारतीने नागदोबाची पूजा केली जाते आणि नागदोबाची ओवी (जत) गायली जाते. या परंपरा आजही श्रद्धेने जपल्या जात आहेत. पूर्वी गावात लग्नसमारंभ किंवा मोठे धार्मिक कार्य असेल, तर लागणारी भांडी, दागिने किंवा इतर साहित्य नागदोबाच्या कृपेने मिळत असे, अशी लोकपरंपरेत सांगितली जाणारी कथा आहे. कोंडीजवळील एका ठराविक जागी शेणाने सारवण करून रांगोळी घातली जाई, पूजा करून आवश्यक वस्तूंची यादी ठेवली जाई. दुसऱ्या दिवशी मागितलेले साहित्य तेथे उपलब्ध होत असे. कार्य संपल्यानंतर ते साहित्य नियोजित वेळी परत ठेवावे लागत असे. मात्र, एका व्यक्तीने परत करताना वस्तू बदलून ठेवल्यामुळे ही कृपा बंद झाली, असे गावातील ज्येष्ठ नागरिक आजही सांगतात. या डोहाशी संबंधित अनेक गूढ कथा लोकपरंपरेत जिवंत आहेत. कोंडीच्या काठावर पूर्वी उंडलीचे एक विशाल झाड होते. त्याचे प्रतिबिंब डोहात पडले की झाडाच्या फांदीला चांदीचा पाळणा लटकलेला दिसे; मात्र प्रत्यक्ष झाडावर असा पाळणा कधीच नसे. ही घटना अनेकांनी अनुभवली असल्याचे वडीलधारी मंडळी सांगतात. तशीच आणखी एक कथा आजही गावात सांगितली जाते. एका पतिव्रता स्त्रीचा अचानक गावातून पत्ता लागेनासा झाला. दोन दिवसांनी ती सुखरूप घरी परतली; मात्र ती कुठे होती, याविषयी तिने काहीही सांगण्यास नकार दिला. घरच्यांच्या आग्रहास्तव तिने एवढेच सांगितले की, "मी दोन दिवस नागदोबाच्या कोंडीत होते" पुढचे शब्द उच्चारण्या आधीच ती मानसिक संतुलन गमावल्याचे सांगितले जाते.
स्थानिकांच्या श्रद्धेनुसार तिने त्या गूढ स्थळाचे रहस्य पाहिले होते आणि ते उघड करण्यास तिला मनाई होती. ही कथा आजही लोकश्रद्धेचा भाग म्हणून सांगितली जाते. कोंडीलगत असलेल्या सपाट जागेला गोड्याची मळी असे म्हणतात. स्थानिकांच्या मते त्या मळीवर केलेले कुंपण कधी टिकत नाही. कारण दररोज मध्यरात्री नागदोबाची पालखी त्या मार्गाने निघते, अशी श्रद्धा आहे. हा मार्ग पुढे गावघराण्याच्या सड्यावरून गोवळगावच्या सीमेपर्यंत जातो. त्या सीमेवर आसराबाईंचे देवस्थान आहे. या पालखीचा मार्ग म्हणून तो रस्ता आजही "पूर्वापार मार्ग" या नावाने ओळखला जातो. अनेक ग्रामस्थांनी मध्यरात्री वाद्यांचा आवाज ऐकला असल्याचे सांगितले जाते. हा अनुभव प्रत्येकाला येत नाही; त्यासाठी भाग्य लाभावे लागते, अशी त्यांची श्रद्धा आहे. या सर्व कथांबाबत प्रत्येकाची श्रद्धा आणि विचार वेगवेगळे असू शकतात. आधुनिक विज्ञान या घटनांकडे वेगळ्या नजरेने पाहते; तर स्थानिक समाज त्यांना आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग मानतो. मात्र, एक गोष्ट निर्विवाद आहे—नागदोबाची कोंड ही देवाचे गोठणे गावाच्या सांस्कृतिक स्मृतीतील एक अमूल्य ठेवा आहे. लोकश्रद्धा, निसर्ग, इतिहास आणि परंपरा यांचा संगम असलेले हे स्थान भावी पिढ्यांसाठी जतन होणे आवश्यक आहे. अशा वारशाचे संवर्धन करणे ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक गावकऱ्याची आणि आपल्या सांस्कृतिक इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.



