*पवनचक्कीवरील अपघातात ज्युनिअर इंजिनियर गौरवसिंग गिरासे यांचा दुर्दैवी मृत्यू*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पवनचक्कीवरील अपघातात ज्युनिअर इंजिनियर गौरवसिंग गिरासे यांचा दुर्दैवी मृत्यू*
*पवनचक्कीवरील अपघातात ज्युनिअर इंजिनियर गौरवसिंग गिरासे यांचा दुर्दैवी मृत्यू*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिफ्ट इंजिनियर म्हणून
कर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका होतकरू तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नंदुरबार तालुक्यात घडली आहे. बलवंड- तिलाली परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्कीवर दुरुस्ती व देखभालीचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले गौरवसिंग युवराजसिंग गिरासे (वय 26, रा. ओसरली, ता. नंदुरबार) ह.मु. डी.जी.नगर दोंडाईचा यांचे दि. 25 जुलै 2026 रोजी धुळे येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. प्राप्त माहितीनुसार 24 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान पवनचक्कीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत गौरवसिंग यांच्या डोक्याला, बरगड्यांना, पोटाला तसेच उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने नंदुरबार येथील निम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्यांना वाचविता आले नाही. गौरवसिंग गिरासे हे गेल्या दीड वर्षांपासून सुझलॉन कंपनीत ज्युनिअर इंजिनियर म्हणून कार्यरत होते. मूळचे ओसरली येथील असलेले गौरवसिंग कुटुंबासह दोंडाईचा येथे वास्तव्यास होते. त्यांचे वडील दोंडाईचा येथील स्टार्च फॅक्टरीमध्ये वायरमन म्हणून कार्यरत असून काही महिन्यांतच सेवानिवृत्त होणार होते. कुटुंबातील एकुलते एक पुत्र असलेले गौरवसिंग हे आई-वडिलांचा मोठा आधार होते. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. 26 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता मूळगावी ओसरली येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. उमदा, कर्तव्यदक्ष आणि सुस्वभावी तरुण अभियंत्याच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसर हळहळला असून सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजनांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करणारी ठरत आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन, नियमित प्रशिक्षण आणि अत्याधुनिक सुरक्षा साधनांचा प्रभावी वापर याकडे सातत्याने लक्ष देणे ही काळाची गरज असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे.



