*विनापरवाना अन्न विक्री करणाऱ्या पेढ्यांवर कारवाई; व्यवसाय बंदचे आदेश!*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विनापरवाना अन्न विक्री करणाऱ्या पेढ्यांवर कारवाई; व्यवसाय बंदचे आदेश!*
*विनापरवाना अन्न विक्री करणाऱ्या पेढ्यांवर कारवाई; व्यवसाय बंदचे आदेश!*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तळोदा शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक मोठी धडक कारवाई केली आहे. शहरात स्वच्छता न बाळगता आणि कोणतीही कायदेशीर नोंदणी किंवा अन्न परवाना (License) न घेता बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या अन्न आस्थापनांची तपासणी करून त्यांच्यावर थेट 'व्यवसाय बंद'चे आदेश बजावण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तळोदा शहरातील काही अन्न आस्थापनांची (व्यावसायिक संस्था) अचानक तपासणी केली. या तपासणी दरम्यान अनेक विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत आवश्यक असणारा अन्न परवाना किंवा नोंदणी केली नसल्याचे उघडकीस आले. तसेच या ठिकाणी कमालीची अस्वच्छता देखील आढळून आली. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या गंभीर बाबींची दखल घेत, दोषी विक्रेत्यांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सदर धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे (महाराष्ट्र राज्य) आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे सह- आयुक्त मगेश माने आणि नंदुरबार कार्यालयाच्या सहायक आयुक्त श्रीमती सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी संकेत सदाफुले यांनी पार पाडली. "जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोरतीला कठोर कारवाई करण्यात येईल." -तुकाराम मुंढे, आयुक्त (अन्न व औषध प्रशासन, म.रा.) अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न विक्रेत्यांना आणि आस्थापनांना कडक शब्दांत आव्हान केले आहे की: अन्नपदार्थांची विक्री करताना नियमांनुसार स्वच्छता बाळगणे बंधनकारक आहे.
ज्या व्यवसायिकांनी अद्याप परवाने घेतले नाहीत, त्यांनी त्वरित foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अन्न परवाना/नोंदणी करून घ्यावी. यापुढेही परवान्याशिवाय अन्न व्यवसाय सुरू ठेवल्यास थेट व्यवसाय बंद करण्याची कडक कारवाई केली जाईल. नागरिकांना शुद्ध व दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा हक्क असून तो मिळवून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी थेट अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. तक्रार करताना तक्रारदाराने स्वतःचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि संबंधित दोषी आस्थापनेचा अचूक पत्ता नमूद करणे आवश्यक आहे, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



