*प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजमधून तापी नदीपात्रात पाणी विसर्गाची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, गुरेढोरे, पाण्याचे पंप व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजमधून तापी नदीपात्रात पाणी विसर्गाची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, गुरेढोरे, पाण्याचे पंप व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन*
*प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजमधून तापी नदीपात्रात पाणी विसर्गाची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, गुरेढोरे, पाण्याचे पंप व शेती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, धरणाचे 4 दरवाजे 0.50 मीटर उंचीने उघडून सुमारे 5368 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे 3 दरवाजे 0.30 मीटर उंचीने उघडून 5422 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळीही वाढत असल्याने पुढील काही तासांत तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज परिसरातील तसेच तापी नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे उपविभागाचे प्रकाशा येथील उपविभागीय अधिकारी राहुल प. वाघ यांनी केले आहे. प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी 3 जुलै 2026 रोजी दुपारी 5 वाजल्यापासून पुढील अंदाजे 24 तासांच्या कालावधीत सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधून तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच पुढील कालावधीत हतनूर, शेलगाव व सुलवाडे बॅरेज धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढण्याचीही शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तापी नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी नदीपात्रात गुरेढोरे सोडू नयेत. तसेच नदीपात्रात ठेवण्यात आलेले पाण्याचे पंप, शेती साहित्य व इतर साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे. नदीपात्रात अनावश्यक वावर टाळून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रकल्पांचे अधोगामी प्रवाहात असलेल्या हतनूर, शेळगाव व सुलवाडे बॅरेज धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग वाढल्यास, वरील प्रकल्पांचे दरवाजे उघडून प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधील पाण्याची पातळी नियंत्रित करत तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे राहुल प. वाघ यांनी आवाहन केले आहे.



