*नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीचा लाभ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात; आधार प्रम
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीचा लाभ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात; आधार प्रम
*नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीचा लाभ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात; आधार प्रमाणीकरण करून लाभ घेण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शेतकरी बांधवांना कर्जबाजारी पणातून मुक्त करून त्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2026’ या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात होणार असून, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील शेती क्षेत्राला गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर अशा विविध नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसला आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढ, शेतीमालाला मिळणारा अस्थिर बाजारभाव आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांना पुन्हा कर्जपात्र बनविण्यासाठी राज्य शासनाने ही ऐतिहासिक योजना राबविली आहे. या योजनेत विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विचार करून सर्वसमावेशक स्वरूपाची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यापूर्वी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘एकवेळ समझोता (One Time Settlement-OTS)’ योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या वाट्याची रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर शासनाकडून निश्चित केलेली कर्जमुक्तीची रक्कम थेट त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या थकबाकीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बँकेचे कर्ज नियमितपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांचाही शासनाने विचार केला आहे. अशा पात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाचा गौरव या निर्णयातून करण्यात आला आहे. कर्जमुक्तीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, वेगवान आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी शासनाने महाआयटीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व आधार क्रमांकावर आधारित केली आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांची माहिती थेट पोर्टलवर अपलोड करण्यात येत असून, संगणकीय पडताळणीनंतर अंतिम लाभार्थी यादी तयार केली जात आहे. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, गाव चावडी, संबंधित बँका, विकास संस्था तसेच आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँकांमार्फत संदेश पाठवूनही लाभाबाबत माहिती दिली जाणार आहे.
कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार क्रमांक अथवा यादीतील विशिष्ट क्रमांकासह संबंधित बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच एकवेळ समझोता (OTS) योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा हिस्सा जमा केल्यानंतरच शासनाकडून उर्वरित कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी अथवा त्रुटी राहू नयेत यासाठी राज्य शासनाने प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कर्जखात्याचा तपशील, आधार माहिती अथवा इतर बाबींमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, अशा तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समिती कार्यरत राहणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत सहकार विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, महाआयटी, राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती व सहकारी बँका, ग्रामपंचायती, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र यांच्यात प्रभावी समन्वय साधण्यात आला आहे. विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, लाभार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीत नाव आल्यानंतर विलंब न करता आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा, तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- 2026’च्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकरी पुन्हा एकदा कर्जमुक्त होऊन नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. त्यामुळे खरीप हंगामात आर्थिक अडचणी दूर होऊन जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला नवी ऊर्जा मिळणार असून, बळिराजाच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि नव्या आशेचा किरण निर्माण होणार आहे.



