*‘शिवाजी कोण होता?’पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘शिवाजी कोण होता?’पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन*
*‘शिवाजी कोण होता?’पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन*
कोल्हापूर(प्रतिनिधी):-कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप करत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने कोल्हापुरातील शिवाजी चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. या पुस्तकाद्वारे महाराजांचा जाज्वल्य इतिहास लोकांसमोर विकृत करून मांडला आहे. चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले. निवेदन स्वीकारल्यावर शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकात ‘भवानी देवीने छत्रपती शिवाजी महाराज यांना तलवार दिलीच नाही’, तसेच “हिंदु धर्मावरील निष्ठेमुळे शिवाजीला यश प्राप्त झाले, हे खरे नाही” असे दावे करण्यात आले असून, ते ऐतिहासिक पुराव्यांच्या पूर्णतः विपरीत आहे. तसेच ‘हिंदवी स्वराज्य’ ही महाराजांची स्वतःची इच्छा होती, हा त्यांचा मूलभूत विचारही पुस्तकात नाकारण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे हिंदू अस्मितेचा पाया असलेल्या महापुरुषांचे ‘वैचारिक खच्चीकरण’ करण्याचा एक सुनियोजित कट आहे. राजमाता जिजाबाई यांनी महाराजांना रामायण-महाभारत आदी धर्मग्रंथांतील कथा सांगून त्यांना मोघलांच्या विरोधात लढण्यासाठी सिद्ध केले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्या बुडवल्या. मोघलांना यमसदनात धाडले. अनेक ठिकाणी मंदिरे उभारली. ते हिंदूंचे राजे झाले. असे असतांना या पुस्तकाद्वारे त्यांची पूर्णत: चुकीची प्रतिमा निर्माण केली गेली आहे. या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, भाजपचे महेश जाधव, हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, आरोग्य भारतीच्या वैद्या अश्विनी माळकर, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक निरंजन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव, हिंदु महासभा महिला आघाडीच्या शीलाताई माने, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे रामभाऊ मेथे, हिंदुत्वनिष्ठ सुहास चव्हाण, शशी बीडकर, ‘नमो नमो’चे जिल्हाध्यक्ष विक्रम जरग यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलकांनी सरकारकडे या पुस्तकाच्या विक्रीवर आणि वितरणावर तात्काळ बंदी घालण्याची आग्रही मागणी केली आहे. महाराजांचा एकेरी उल्लेख न हटवणाऱ्या प्रकाशक आणि संबंधित संस्थांवर भारतीय न्याय संहिता कलम 299 आणि 196अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निवेदनात नमूद केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने इतिहासतज्ज्ञांची एक उच्चस्तरीय समिती नेमून या पुस्तकातील प्रत्येक विधानाचा अभ्यास करावा आणि केवळ छापील पुस्तकेच नव्हे, तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स साईट्सवर उपलब्ध असलेल्या डिजिटल प्रती आणि पीडीएफ लिंक्स सायबर कायद्यांतर्गत तात्काळ ब्लॉक कराव्यात, अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.



