*जी. टी. पाटील महाविद्यालयात ‘रन फॉर स्वदेशी’ उपक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील महाविद्यालयात ‘रन फॉर स्वदेशी’ उपक्रम उत्साहात संपन्न*
*जी. टी. पाटील महाविद्यालयात ‘रन फॉर स्वदेशी’ उपक्रम उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी. टी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा दिनाच्या औचित्याने ‘रन फॉर स्वदेशी’ या जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वदेशी विचारसरणीचा प्रचार व युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, आत्मनिर्भरतेची भावना रुजविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “राजमाता जिजाऊंनी दिलेले संस्कार आणि स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांसाठी दीपस्तंभ आहेत. आजच्या युवकांनी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करून देशाच्या आर्थिक विकासात योगदान दिले पाहिजे. आरोग्य, शिस्त व राष्ट्रनिष्ठा या त्रिसूत्रीचा अंगीकार केला तरच सक्षम भारत घडू शकेल,” असे प्रतिपादन त्यांनी केले. या रन फॉर स्वदेशी दौडीत एकूण 150 राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. युवकांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव व आरोग्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, उपप्राचार्य डॉ. संदीप पाटील, जेसीओ रणवीर सिंग, प्रा. अंकुश रघुवंशी, डॉ. डी. डी. गावीत आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून अशा उपक्रमांमधून व्यक्तिमत्त्व विकास साध्य होत असल्याचे मत व्यक्त केले. दौडीतील यशस्वी स्पर्धकांमध्ये मुलींच्या गटात अश्विनी धनराज पाटील (प्रथम), किरण राठोड (द्वितीय) व कल्याणी नारायण पाटील (तृतीय) यांनी यश संपादन केले. तर मुलांच्या गटात विकी जावरे (प्रथम), रोशन कोळी (द्वितीय) व गणेश पाटील (तृतीय) यांनी अनुक्रमे विजेतेपद पटकावले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन एनसीसी अधिकारी लेफ्टनंट डॉ. व्ही. झेड. चौधरी व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज शेवाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स व एनएसएस स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘रन फॉर स्वदेशी’सारख्या उपक्रमातून युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वावलंबन व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र या कार्यक्रमातून दिसून आले. प्रा हर्षबोध बैसाणे व प्रा राजश्री बाविस्कर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



