*विनोबा ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा, नंदुरबार जिल्ह्यातील चार शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते गौरव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विनोबा ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा, नंदुरबार जिल्ह्यातील चार शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते गौरव*
*विनोबा ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा,नंदुरबार जिल्ह्यातील चार शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते गौरव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत नावीन्यपूर्ण बदल घडवून आणणे आणि शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सक्षम करणे, या उद्देशाने नंदुरबार जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्य कार्यक्रमांतर्गत विनोबा ॲपच्या ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद नंदुरबार येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या शुभहस्ते तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती क्रांती आरसूड यांच्या उपस्थितीत पुरस्कारप्राप्त शिक्षकांना सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य किट देऊन गौरविण्यात आले. यावेळी विनोबा ॲपचे जिल्हा प्रोजेक्ट ऑफिसर यश पांडे उपस्थित होते. या पुरस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातील चार शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये विशाल दिलीप पाटील (प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजेपूर), गोपाल होनजी गावित (प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद कन्या शाळा प्रकाशा, ता. शहादा), श्रीमती वृषाली राजू साळवे (प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालेर), श्रीमती सोनाली रवींद्र पाटील (प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा नारायणपूर) यांचा समावेश आहे. भालेर जिल्हा परिषद शाळेतील कु.धनश्री किशोर पाटील या विद्यार्थिनीने आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या विषयी भाषण सादर केले. या शिक्षकांनी विनोबा ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम, अध्यापन साहित्य आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक कृतींचे प्रभावी सादरीकरण केल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
शिक्षकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी विनोबा ॲप
शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी, कृतीशील आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा परिषदेने पुणे येथील ओपन लिंक्स फाउंडेशनच्या सहकार्याने ‘विनोबा’ हे विशेष मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. या ॲपच्या माध्यमातून आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षकांना अध्यापनातील नवनवीन पद्धती, शैक्षणिक साहित्य, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध व्हावी, तसेच शिक्षकांमध्ये परस्पर संवाद आणि शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
एका क्लिकवर शिक्षकांना शैक्षणिक व्यासपीठ
विनोबा ॲप हे केवळ माहिती मिळविण्याचे साधन नसून शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी उपयुक्त डिजिटल व्यासपीठ ठरत आहे. या ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांना एकमेकांशी ऑनलाइन संवाद साधता येतो. अध्यापनातील विविध प्रयोग, नावीन्यपूर्ण शैक्षणिक कृती, अध्ययन-अध्यापन साहित्य, शैक्षणिक व्हिडिओ आणि यशस्वी उपक्रम अपलोड करता येतात. एका शाळेत राबविण्यात आलेला उपक्रम दुसऱ्या शाळेतील शिक्षकांनाही पाहता येतो. त्यामुळे चांगल्या शैक्षणिक प्रयोगांची देवाणघेवाण सुलभ होते. शिक्षकांना नवीन अध्यापन कौशल्ये आत्मसात करण्याची, स्वतःच्या अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्याची आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ घडवून आणण्याची संधी मिळते. राज्यासह परराज्यातील शिक्षकांनाही या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमांची माहिती मिळू शकते.
विनोबा ॲपचे शिक्षक व शाळांसाठी महत्त्वपूर्ण फायदे
विनोबा ॲपमुळे शाळांमधील शैक्षणिक उपक्रमांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होत असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन मिळत आहे.विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी उपयुक्त, शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्यास मदत, नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची देवाणघेवाण सुलभ, शिक्षकांना तंत्रज्ञानस्नेही बनविण्यास प्रोत्साहन, शैक्षणिक साहित्य व अध्यापन व्हिडिओंची उपलब्धता, जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यास मदत.
शिक्षकांच्या विविध प्रश्नांचे व प्रस्तावांचे वेळेत निराकरण करण्यासाठी सहाय्य.
उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन व सन्मान. उत्कृष्ट कार्याची दखल म्हणजे शिक्षकांसाठी नवी प्रेरणा, शिक्षकांनी केलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार व शैक्षणिक साहित्य किट देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अशा पुरस्कारांमुळे शिक्षकांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन शाळांमध्ये विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग राबविण्यास प्रोत्साहन मिळत आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी विनोबा ॲपचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्य कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अध्यापन विषयक साहित्याचे आदान -प्रदान, नावीन्य पूर्ण उपक्रमांची माहिती आणि शिक्षकांमधील परस्पर संवाद यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस निश्चितच मदत होणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांचे विविध प्रश्न व प्रस्ताव वेळेत मार्गी लावण्यासाठीही हे व्यासपीठ सहाय्यभूत ठरणार आहे. एकंदरीत, विनोबा ॲप हे शिक्षकांच्या ज्ञानवृद्धीचे, डिजिटल सक्षमीकरणाचे आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रभावी माध्यम ठरत आहे. शिक्षकांच्या कल्पकतेला डिजिटल व्यासपीठ, उत्कृष्ट कार्याला पुरस्कार आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला नवी दिशा देणारा हा उपक्रम नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.



