*राष्ट्रीय एकता दिवस व इंदिरा गांधी स्मृतिदिनानिमित्त प्रकाशा येथे संयुक्त अभिवादन कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश, विद्यार्थ्यांना देशप्र
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राष्ट्रीय एकता दिवस व इंदिरा गांधी स्मृतिदिनानिमित्त प्रकाशा येथे संयुक्त अभिवादन कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश, विद्यार्थ्यांना देशप्र
*राष्ट्रीय एकता दिवस व इंदिरा गांधी स्मृतिदिनानिमित्त प्रकाशा येथे संयुक्त अभिवादन कार्यक्रम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश, विद्यार्थ्यांना देशप्रेम,एकता आणि अखंडतेची प्रेरणा*
शहादा(प्रतिनिधी):-भारताच्या इतिहासात 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून देणारा महत्त्वपूर्ण दिवस म्हणून ओळखला जातो. भारताचे लोहपुरुष, देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो. तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनाही अभिवादन करण्यात येते.
या निमित्ताने शहादा तालुक्यातील प्रकाशा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळा प्रकाशा, जिल्हा परिषद कन्या शाळा प्रकाशा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा प्रकाशा यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन व जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ सेविका बकुळा चव्हाण व सौ. रंजना लोहार यांच्या शुभहस्ते सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर केंद्रमुख्याध्यापक रामलाल पारधी यांनी सविस्तर माहिती दिली. तिन्ही शाळेतील शिक्षक वृंदांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख मनोज पिंजारी यांनी राष्ट्रीय एकता दिवसाचे महत्त्व अधोरेखित करताना विद्यार्थ्यांनी जात, धर्म, भाषा आणि प्रांत यापलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र राहण्याची गरज व्यक्त केली.
याप्रसंगी शिक्षक गोपाल गावीत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. स्वातंत्र्यानंतर अनेक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून देशाच्या एकात्मतेचा मजबूत पाया रचण्याचे ऐतिहासिक कार्य सरदार पटेल यांनी केले. त्यांच्या दूरदृष्टी, कणखर नेतृत्व आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेमुळे भारताच्या एकीकरणाला दिशा मिळाली. म्हणूनच त्यांना 'लोहपुरुष' ही उपाधी सार्थ ठरते, असे त्यांनी सांगितले.
तसेच इंदिरा गांधी यांच्या राजकीय नेतृत्वाचा, देशाच्या विकासातील योगदानाचा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. राष्ट्रीय एकता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती आपल्या विचारांत, आचारांत आणि दैनंदिन जीवनात रुजली पाहिजे. देशाची एकता, अखंडता आणि बंधुभाव जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.कार्यक्रमात विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय महापुरुषांविषयी आदर,इतिहासाची जाण, देशप्रेम, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होते.
या कार्यक्रमाला प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख मनोज पिंजारी, केंद्र मुख्याध्यापक रामलाल पारधी, मुख्याध्यापक जावेद अब्दुल रशीद मन्सूरी, गोपाल गावीत, संगीता राणे, नूतन पाटील, शबीना बानो जलालोद्दीन, विशेष शिक्षक जितेंद्र चौधरी व स्वयंपाकीण सुमन सामुद्रे, प्रमिला भोई, हाफेजा बी नियाजोद्दीन यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी केंद्र मुख्याध्यापक रामलाल पारधी यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. राष्ट्रीय एकता हीच राष्ट्राची खरी ताकद असून विविधतेतून एकता जपणे हीच सरदार वल्लभभाई पटेल यांना खरी आदरांजली ठरेल, असा प्रेरणादायी संदेश या संयुक्त कार्यक्रमातून देण्यात आला.



