*नवापुरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, 'युवा क्रांती संघटना' आक्रमक, पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना दिले निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापुरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, 'युवा क्रांती संघटना' आक्रमक, पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना दिले निवेदन*
*नवापुरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, 'युवा क्रांती संघटना' आक्रमक, पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना दिले निवेदन*
नवापुर(प्रतिनिधी):-नवापूर शहर व परिसरात शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळेत अल्पवयीन विद्यार्थ्यांची वाढती गैरहजेरी, वर्ग सोडून बाहेर फिरणे तसेच लॉज व हॉटेल्ससह विविध सार्वजनिक व खाजगी ठिकाणी आढळणारे गैरवर्तन याविरोधात युवा क्रांती सामाजिक संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या गंभीर प्रकारामुळे शाळकरी मुले व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीचे सविस्तर निवेदन संघटनेच्या वतीने नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना सादर करण्यात आले आहे. संघटनेतर्फे सध्या तालुक्यामध्ये ‘विद्यार्थी सुरक्षा अभियान’ राबवले जात असून, या अभियानादरम्यान अनेक धक्कादायक व चिंताजनक बाबी समोर आल्या आहेत. शालेय व महाविद्यालयीन वेळेत अनेक विद्यार्थी वर्ग सोडून बाहेर फिरताना आढळतात. इतकेच नव्हे तर, लॉज व हॉटेल्समध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती निदर्शनास येत असून हा प्रकार अत्यंत गंभीर रूप धारण करत आहे. ही बाब भारतीय न्याय संहिता मधील कलम 93 तसेच पोक्सो कायद्याच्या तरतुदींनुसार अतिशय गंभीर व संशयास्पद आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या शैक्षणिक व भविष्यात्मक भवितव्यावर मोठा आघात होत आहे. या पार्श्वभूमीवर युवा क्रांती संघटनेने प्रशासनाकडे कडक मागण्या मांडल्या आहेत. शहरातील सर्व हॉटेल्स आणि लॉज चालकांना कडक सूचना देऊन शालेय वेळेत कोणत्याही अल्पवयीन विद्यार्थ्याला प्रवेश देण्यावर पूर्णपणे बंदी घालावी. शाळा व महाविद्यालयीन परिसरात शैक्षणिक वेळेत पोलीस प्रशासनाकडून नियमित व कडक गस्त ठेवण्यात यावी. तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात करून नोंदवही (Register) ठेवणे अनिवार्य करावे. तसेच शाळेच्या वेळेत कोणत्याही विद्यार्थ्याला पालकांच्या स्पष्ट परवानगीशिवाय आवाराबाहेर सोडू नये आणि विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये ‘विद्यार्थी सुरक्षा’ आणि ‘पोक्सो कायदा 2012’ बाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना हे निवेदन सादर करताना युवा क्रांती संघटनेचे नवापूर तालुका अध्यक्ष अविनाश गावित, तालुका उपाध्यक्ष आकाश गावित, जनसंपर्क तालुका अध्यक्ष योगेश गावित, तालुका सदस्य जितेश गावित, कृनाल वसावे, धर्मेश गावित, अविनाश वसावे, अविनाश ठाकूर, तसेच लक्कडकोटचे सरपंच विकी गावित आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर निवेदन हे संपूर्णपणे जनहितार्थ आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देण्यात आले असून पोलीस प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली आहे.



