*नंदुरबार जिल्हास्तरीय युवा महोत्सव 3 नोव्हेंबरला, युवक-युवतींना कला-कौशल्य सादरीकरणाची संधी,30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हास्तरीय युवा महोत्सव 3 नोव्हेंबरला, युवक-युवतींना कला-कौशल्य सादरीकरणाची संधी,30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
*नंदुरबार जिल्हास्तरीय युवा महोत्सव 3 नोव्हेंबरला, युवक-युवतींना कला-कौशल्य सादरीकरणाची संधी,30 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2026 -27 चे आयोजन 3 नोव्हेंबर 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथील बॅडमिंटन इनडोअर हॉलमध्ये करण्यात येणार आहे. इच्छुक युवक-युवतींनी 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रवेश अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीयस्तरावर केले जाते. सन 2026-27 यावर्षी महोत्सवाची संकल्पना ‘ Nasha Mukt Yuva For Viksit Bharat ’ वर आधारीत आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला, कविता आणि लेखन या स्पर्धा होणार आहेत. समूह लोकनृत्य व समूह लोकगीतासाठी प्रत्येकी 7 कलाकार व 3 सहाय्यक कर्मचारी, पथनाट्यासाठी 10 सहभागी, तर चित्रकला स्पर्धेसाठी 2 आणि कविता लेखन स्पर्धेसाठी 1 सहभागी अशी स्पर्धक संख्या निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धांमधून निवड झालेल्या स्पर्धकांना विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
वयोमर्यादा व अर्ज प्रक्रियेबाबत सूचना, या महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकार, सहकलाकार व साथसंगत करणाऱ्यांचे वय 15 ते 29 वर्षे असणे आवश्यक आहे. वयाची गणना 17 ऑगस्ट 2026 रोजीच्या स्थितीनुसार करण्यात येईल. इच्छुकांनी विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे सादर करावेत. स्पर्धांमध्ये सिंथेसायझर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करण्यास परवानगी नाही. तसेच लोकनृत्य स्पर्धेसाठी टेप, सीडी, पेनड्राइव्ह आदी माध्यमांवरील संगीत वापरता येणार नाही.
नंदुरबार जिल्ह्यातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला व युवक मंडळे तसेच विविध कला व क्रीडा मंडळांतील इच्छुक कलाकार व स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक 8625946709 वर संपर्क साधावा.



