*मोहरमच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 21 जूनपर्यंत मनाई आदेश, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मोहरमच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 21 जूनपर्यंत मनाई आदेश, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश*
*मोहरमच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात 21 जूनपर्यंत मनाई आदेश, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यात मोहरम महिन्याच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रम, ताजिया मिरवणुका, सार्वजनिक उपक्रम तसेच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी संपूर्ण जिल्ह्यात 7 जून 2026 रोजी रात्री 00.01 पासून मनाई आदेश लागू केला आहे. हा आदेश 21 जून 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. जिल्ह्यात विविध संघटनांकडून सभा, मोर्चे, आंदोलने तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. याशिवाय मोहरम महिन्यात दहा दिवस विविध ठिकाणी ताजिया (डोल-ताजिया) मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. अशा परिस्थितीत सार्वजनिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशानुसार जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस तलवारी, भाले, दांडके, काठ्या, सुरे किंवा शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरता येतील अशी शस्त्रे अथवा वस्तू बाळगण्यास व घेऊन फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दाहक पदार्थ, स्फोटके किंवा इतर धोकादायक वस्तू जवळ बाळगणे अथवा वाहून नेणेही प्रतिबंधित राहील. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक घोषणा देणे, आक्षेपार्ह भाषणे करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविणारी कृत्ये करणे, व्यक्ती अथवा प्रतिमांचे आक्षेपार्ह प्रदर्शन करणे किंवा दहन करणे यासही मनाई करण्यात आली आहे. अशा कृतींमुळे सामाजिक सलोखा आणि शांतता बाधित होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मात्र, कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी, शासकीय अधिकारी - कर्मचारी तसेच शासनाने अधिकृत परवानगी दिलेल्या व्यक्तींना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच संबंधित पोलीस ठाण्याच्या परवानगीने कायदेशीर सभा, मिरवणुका किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मोहरम उत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पडावा आणि जिल्ह्यात सामाजिक ऐक्य व सौहार्द कायम राहावे, यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्पष्ट केले आहे.



