*हरणखुरी गावाचे आरोग्यदूत पाऊल, पात्र लाभार्थ्यांची 100% आयुष्मान कार्ड नोंदणीची ऐतिहासिक कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हरणखुरी गावाचे आरोग्यदूत पाऊल, पात्र लाभार्थ्यांची 100% आयुष्मान कार्ड नोंदणीची ऐतिहासिक कामगिरी*
*हरणखुरी गावाचे आरोग्यदूत पाऊल, पात्र लाभार्थ्यांची 100% आयुष्मान कार्ड नोंदणीची ऐतिहासिक कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियान आणि आदर्श ग्राम अभियान अंतर्गत गृप ग्रामपंचायत भुजगाव यांच्या पुढाकारातून आयुष्मान भारत कार्ड नोंदणी यशस्वीरीत्या केली आहे. धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील एक लहानसे गाव हरणखुरी आज संपूर्ण जिल्ह्यातच एक प्रेरणास्त्रोत ठरत आहे. कारण हरणखुरी हे धडगाव जिल्ह्यातील पहिले असे गाव ठरले आहे, जिथे 100% पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत कार्ड नोंदणी यशस्वीरीत्या पार पडली आहे. ही योजना राबवतांना केवळ प्रशासन नव्हे, तर ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, स्थानिक युवक, आणि खुद्द सरपंच यांनी अतुलनीय मेहनत घेतली आहे.
गावातील प्रत्येक कुटुंबाला "आयुष्मान भारत – जन आरोग्य योजना" अंतर्गत विमा संरक्षण मिळावे, हा निर्धार ग्रामपंचायतीने केला होता. यासाठी गावात विशेष शिबिर आयोजित करण्यात आले, जे सकाळी 8 वाजता सुरू होऊन रात्री 11 वाजेपर्यंत चालत होते. हे शिबिर फक्त एकदाच नव्हते, तर प्रत्येक पाडयासाठी स्वतंत्र दिवशी ठेवण्यात आले, जेणेकरून कोणतीही व्यक्ती किंवा घर या योजनेपासून वंचित राहणार नाही. राहिलेल्या कुटुंबांना आशाताई यांच्या माध्यमातून घरापर्यंत निरोप देण्यात आला.
या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले होते. प्रत्येक घरापर्यंत निरोप पोहोचवण्यात आला, ज्यामध्ये आशाताई, अंगणवाडी सेविका, युवाकार्य प्रशिक्षणार्थी व स्थानिक तरुणांचा मोठा वाटा होता. त्यांनी घराघरात जाऊन लोकांना योजनेचे महत्त्व पटवून दिले, आवश्यक कागदपत्रे गोळा केली, आणि त्यांच्या शंका दूर केल्या. या मोहिमेत सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे रेशनकार्ड लिंकींग आणि त्यातील त्रुटी. अनेक घरांची माहिती अपूर्ण होती, रेशनकार्ड जुने होते किंवा ऑनलाइन नव्हते. ही अडचण दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्वप्रथम रेशनकार्ड ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. या कामात तहसीलदार श्री. ज्ञानेश्वर सपकाळे यांचे अमूल्य सहकार्य लाभले. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करताना, आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.
ग्रामपंचायतीच्या या यशामध्ये सरपंच अर्जुन पावरा यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी या योजनेला केवळ सरपंच म्हणून नव्हे, तर एक जबाबदार ग्रामस्थ म्हणून हात घातला. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष बसून 300 हून अधिक आयुष्मान कार्ड स्वतः तयार केली. एवढेच नव्हे, तर 50 पेक्षा अधिक रेशनकार्ड ऑनलाईन करून अनेक गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला. त्यांच्या कार्यशैलीमध्ये कोणतीही औपचारिकता नव्हती — तर होती ती सेवाभावाची निष्ठा. गावातील अनेक नागरिक त्यांना "आपले माणूस" म्हणून संबोधतात, हेच त्यांच्या कार्याचे खरे यश आहे.
या यशानंतर गावकऱ्यांची मते ऐकण्यासारखी आहेत. रमेश उग्रावण्या पावरा हे म्हणाले, "सरपंचांनी जसं स्वतः समोर येऊन काम केलं, तसं फार कमी वेळा पाहायला मिळतं. आम्हाला वाटायचं की सरकारी योजना म्हणजे कागदपत्रांचा आणि धावपळीचा त्रास, पण इथे सगळं सोपं करून दिलं गेलं." राकेश पावरा ग्रामस्थ म्हणतात, "पूर्वी आजारी पडलो की उपचाराला पैसे नव्हते. आता आयुष्मान कार्डामुळे मानसिक समाधान आहे, की कधीही मोठा आजार आला, तरी उपचारासाठी आधार आहे."
या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामपंचायतीच्या एकजुटीचा आणि गावकऱ्यांच्या सहकार्याचा उत्तम संगम पाहायला मिळाला. महिला, युवक, आशाताई, आणि अधिकारी यांचे परिश्रम एका मोठ्या यशामध्ये रूपांतरित झाले. हरणखुरीने केवळ एक शासकीय योजना यशस्वीपणे राबवली नाही, तर ‘स्वस्थ गाव, समर्थ गाव’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले आहे. आज हरणखुरी हे नाव जिल्ह्यात कौतुकाने घेतले जात आहे. प्रशासन, सामाजिक संस्था, आणि अन्य ग्रामपंचायतींसाठी हे गाव एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे की योग्य नियोजन, नेतृत्व, आणि लोकसहभाग असला, तर कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते.
हरणखुरी आता केवळ एक गाव नाही, तर आरोग्यदूत गाव ठरले आहे — एक आदर्श, एक प्रेरणा, आणि एक यशोगाथा!
प्रतिक्रिया
जायली पावरा (आशा सेविका):
"गावागावात जाऊन लोकांना समजावणं सोपं नव्हतं. पण जेव्हा लोकांनी आमचं ऐकलं आणि आपले कागद तयार ठेवले, तेव्हा वाटलं आपलं श्रम वाया गेले नाहीत. आता सगळ्या घरांना आरोग्याचं कवच मिळालं आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."



